ऐतिहासिक! नाशिकच्या सुपुत्राची जागतिक भरारी!, सपोनि महेश हिरे यांची अमेरिकेत सुवर्णझेप; महाराष्ट्र पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा!

नाशिकच्या मातीतून, थेट अमेरिकेच्या पोडियमवर! महेश हिरे यांनी रचला इतिहास!

लाल 🚨 दिवा नाशिक, दि.२६:- ०८ जुलै (विशेष प्रतिनिधी):अमेरिकेतील बर्मिंगहॅमच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला, निमित्त ठरले ते नाशिक पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे! ‘२१ व्या जागतिक पोलीस आणि फायर गेम्स २०२५’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, जगभरातील ९० देशांतील कसलेल्या नेमबाजांना मात देत महेश हिरे यांनी १० मीटर एअर पिस्तूल शुटींग प्रकारात सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या नेत्रदीपक विजयाने केवळ महाराष्ट्र पोलीस दलाचीच नव्हे, तर संपूर्ण भारताची मान जगात उंचावली आहे.

२६ जून ते ०७ जुलै २०२५ दरम्यान अमेरिकेतील अलाबामा येथे पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत महेश हिरे यांनी कमालीचे मानसिक संतुलन आणि अचूकतेचा परिचय दिला. त्यांनी लावलेला प्रत्येक नेम जणू सुवर्णपदकालाच गवसणी घालत होता. विशेष म्हणजे, सन १९६१ नंतर प्रथमच भारताला या नेमबाजी प्रकारात सुवर्णपदक मिळवून देण्याचा भीमपराक्रम त्यांनी केला आहे. महाराष्ट्र पोलीस दलातून या स्पर्धेतील पिस्तूल शुटींग प्रकारात सहभागी होणारे आणि सुवर्णपदक जिंकणारे ते पहिलेच अधिकारी ठरल्याने या विजयाचे महत्त्व द्विगुणीत झाले आहे.

या जागतिक विजयानंतर शहरात परतलेल्या या सुवर्णवीराचे पोलीस दलातर्फे जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला. पोलीस आयुक्त मा. श्री. संदिप कर्णिक यांनी महेश हिरे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. “महेश हिरे यांनी कर्तव्य आणि आवड यांचा सुंदर मेळ साधत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश हे संपूर्ण दलासाठी अभिमानास्पद आहे. त्यांची ही कामगिरी इतर अधिकारी आणि तरुणांसाठी एक नवा आदर्श निर्माण करेल,” अशा शब्दांत त्यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) मा. श्री. चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) मा. श्री. किरणकुमार चव्हाण, परिमंडळ-१ च्या पोलीस उप आयुक्त मा. श्रीमती मोनिका राउत, परिमंडळ-२ चे पोलीस उप आयुक्त मा. श्री. किशोर काळे, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. श्री. संदिप मिटके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हिरे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य पोलीस शुटींग संघाचे कॅप्टन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंकुश चिंतामण आणि पोउनि श्री. सुदर्शन बोडके हे देखील या आनंदात सहभागी झाले होते.

आपल्या भावना व्यक्त करताना सपोनि महेश हिरे म्हणाले, “हे यश माझे एकट्याचे नाही, तर माझे कुटुंबीय, माझे वरिष्ठ अधिकारी आणि संपूर्ण पोलीस दलाच्या पाठिंब्याचे आहे. देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले, याचा मनस्वी आनंद होत आहे.”

एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या जिद्दीच्या आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश निश्चितच “गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा” या उक्तीला साजेसे आणि प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!