नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीवर विशेष भर; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
लाल 🚨 दिवा नाशिक, दि. २६ (आमच्या प्रतिनिधीकडून):शहरातील गुन्हे दोषसिद्धीचा दर (conviction rate) वाढविणे आणि नुकत्याच अंमलात आलेल्या नवीन कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नाशिक शहर पोलीस आणि सरकारी अभियोक्ता यांच्यात एका विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून मंगळवारी (दि. २२) सायंकाळी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हे चर्चासत्र पार पडले.

या चर्चासत्रासाठी विशेष सरकारी वकील श्री. अजय मिसर आणि सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता श्री. अनिल बागले हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि रोप देऊन या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. मिसर आणि श्री. बागले यांनी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मार्गदर्शन केले. न्यायालयामध्ये पुरावे (मुद्देमाल) सादर करण्याची पद्धत, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल, साक्षीदारांना वेळेवर समन्स बजावणे आणि जामीन अर्जांवर प्रभावी अहवाल सादर करणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी सूचना केल्या.
बदलत्या काळानुसार अंमलात आलेल्या नवीन कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि त्यातील तरतुदींचे सखोल ज्ञान यावरही चर्चासत्रात विशेष भर देण्यात आला. कायदेशीर प्रक्रिया अधिक गतिमान आणि अचूक करण्यावर दोन्ही तज्ज्ञांनी जोर दिला.
यावेळी पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्यासह अभियोग कक्षाचे अधिकारी उपस्थित होते. चर्चासत्राच्या समारोपात, न्यायालयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सरकारी अभियोक्ता आणि कोर्ट पैरवी अंमलदारांना प्रशंसापत्र देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे पोलीस आणि अभियोक्ता यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.







