गुन्हेगारांनो, आता तुमची खैर नाही! नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताफ्यात ‘सुपर व्हॅन’, गुन्हेगारांचे धाबे दणाणणार!

अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनमुळे गुन्हेगारी तपासाला मिळणार नवी दिशा; आता प्रत्येक पुरावा बोलणार!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २७ (विशेष प्रतिनिधी):नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे तपास क्षमतेत आता अमुलाग्र क्रांती घडणार आहे. गुन्हेगारांपेक्षा चार पावले पुढे राहण्यासाठी आणि प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस दलाला आज एक नवे ‘ब्रह्मास्त्र’ मिळाले आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण आज पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात करण्यात आले. या व्हॅनमुळे आता घटनास्थळावरील लहानात लहान पुरावाही पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सध्याच्या डिजिटल युगात गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरून पोलिसांना चकवा देत आहेत. अनेकदा, गुन्हा घडल्यानंतरही ठोस शास्त्रीय पुराव्यांअभावी आरोपी न्यायालयातून सहीसलामत सुटतात. यामुळे पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाते आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन मिळते. याच समस्येवर ‘रामबाण उपाय’ म्हणून ही फॉरेन्सिक व्हॅन काम करणार आहे. या कार्यक्रमावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हरिष खेडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांच्यासह न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेतील तज्ज्ञ आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

‘चालते-फिरते तपास केंद्र’ – काय आहे या व्हॅनमध्ये?

ही केवळ एक सामान्य व्हॅन नसून, एक चालते-फिरते अत्याधुनिक तपास केंद्र आहे. यामध्ये:

इन्स्टंट घटनास्थळ तपासणी: गुन्हा घडल्याची माहिती मिळताच ही व्हॅन तज्ञांसह तात्काळ घटनास्थळी रवाना होणार.

तज्ञांची फौज:न्यायसहायक वैज्ञानिक, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, आणि फोटोग्राफर यांची टीम एकाच वेळी घटनास्थळी हजर राहणार.

अत्याधुनिक किट्स: रक्त, केस, मातीचे नमुने ते डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी जागतिक दर्जाची उपकरणे आणि इन्व्हेस्टीगेशन किट्स.

नवीन कायद्याची अंमलबजावणी: भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर गुन्ह्यांच्या तपासात घटनास्थळावरून शास्त्रीय पुरावे गोळा करणे बंधनकारक असून, ही व्हॅन त्याची पूर्तता करणार आहे.

यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील म्हणाले, “ही केवळ एक गाडी नाही, तर गुन्हेगारांच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या हाती आलेले एक शक्तिशाली शस्त्र आहे. आता कोणताही पुरावा नष्ट होणार नाही. भौतिक, जैविक आणि वैज्ञानिक पुराव्यांची भक्कम साखळी तयार करून आम्ही आरोपींना कायद्याच्या कचाट्यातून सुटू देणार नाही. गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी या व्हॅनचा सिंहाचा वाटा असेल.”

या अत्याधुनिक व्हॅनच्या समावेशामुळे नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले असून, जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. आता गुन्हेगारीचा तपास अधिक वेगवान, अचूक आणि परिणामकारक होणार, हे निश्चित

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!