फॉरेक्स ट्रेडिंगच्या नादात बनले चेन स्नॅचर; नाशिक पोलिसांच्या जाळ्यात!

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वयोवृद्धेला लुटणारे ‘हाय-टेक’ चोरटे जेरबंद; गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१६ :- शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कंगाल झालेल्या दोन तरुणांनी चक्क एका वयोवृद्ध महिलेच्या गळ्यावर हात टाकला. पत्ता विचारण्याचा बहाणा करत आजीबाईच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून पळ काढणाऱ्या या दोघांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला यश आले आहे. प्रथमेश उशीर (वय २२) आणि जोएल म्हस्के (वय १९) अशी या संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक ११ सप्टेंबर रोजी पंचवटी परिसरात एक धक्कादायक घटना घडली. एका वयोवृद्ध आजी घरात जात असताना, सिल्व्हर रंगाच्या अॅक्सिस मोपेडवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. काही कळायच्या आतच एकाने आजींच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि दोघेही सुसाट वेगाने पसार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पीडित महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

ज्येष्ठ नागरिकांसोबत घडलेला हा गुन्हा गांभीर्याने घेत पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट १ चे पथक आरोपींचा शोध घेत असतानाच, पोलीस हवालदार विशाल काठे आणि नाझिमखान पठाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली. बातमी होती की, गुन्ह्यातील संशयित तरुण त्याच अॅक्सिस मोपेडवरून (क्र. एमएच १५ डीजी २४७१) उपनगर आणि जेलरोड परिसरात येणार आहेत.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत आणि त्यांच्या पथकाने उपनगर भागातील पाडेकर गॅस एजन्सीजवळ सापळा रचला. काही वेळातच संशयित मोपेडवरून येताच पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. शेअर मार्केटमधील फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा तोटा झाल्याने झटपट पैसे मिळवण्यासाठी हा गुन्हा केल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली. वकीलवाडी येथूनच त्यांनी या वृद्ध महिलेचा पाठलाग केल्याचेही तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेली ८०,००० रुपये किमतीची अॅक्सिस मोपेड आणि चोरलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची वितळवून बनवलेली १,१०,००० रुपये किमतीची १०.६५० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड असा एकूण १,९०,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट १ च्या संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे नाशिक शहरातील सोनसाखळी चोरांचे धाबे दणाणले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!