एकाच रात्री दुसरा भूकंप! LCB बदलीसाठी पोलिसाकडून उकळले २ लाख; आरोपी तोच, कहाणी नवी.!

पहिल्या गुन्ह्यातील आरोपीच दुसऱ्या गुन्ह्यात फिर्यादीचा मित्र; ‘ट्रान्सफर किंग’ सागर पांगरे पाटीलवर खंडणीचा आणखी एक गुन्हा!

लाल 🚨 दिवा नाशिक, दि. २९ (विशेष प्रतिनिधी):नाशिक पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या ३५ लाखांच्या खंडणी प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, त्याच टोळीच्या आणखी एका कारनाम्याचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस दलातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) बदलीचे आमिष दाखवून एका पोलीस कर्मचाऱ्याकडून तब्बल २ लाख रुपये उकळल्याचा आणि नंतर आणखी पैशांसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही गुन्ह्यांचा सूत्रधार एकच असून, या प्रकरणातील गुंतागुंतीने तपास अधिकारीही चक्रावले आहेत.

या दुसऱ्या भूकंपाची हकीकत अशी की, मालेगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार गौतम भिकन बोराळे (वय ३७) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आरोपी सागर बाळासाहेब पांगरे पाटील (वय ३५) याने पुन्हा एकदा आपल्या ‘वरपर्यंतच्या ओळखी’चा बनाव रचला. त्याने बोराळे आणि त्यांचा मित्र नितीन सपकाळे यांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेत बदली करून देण्याचे खोटे आश्वासन दिले.

१५ ते २५ जुलै दरम्यान चांडक सर्कल येथे झालेल्या भेटींमध्ये सागरने या ‘डील’साठी बोराळे यांच्याकडून वेळोवेळी एकूण २ लाख रुपये खंडणी स्वरूपात उकळले. मात्र, त्याची पैशांची भूक शमली नाही. त्याने बोराळे यांच्याकडे आणखी एक लाख रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास “तुमची कुठेही बदली करून नुकसान करीन,” अशी थेट धमकी दिली.

कहाणीतील धक्कादायक ट्विस्ट!

या प्रकरणाला खरी कलाटणी तेव्हा मिळाली, जेव्हा फिर्यादी गौतम बोराळे यांचा मित्र म्हणून उल्लेख असलेला ‘नितीन सपकाळे’ हाच आधीच्या ३५ लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील सह-आरोपी असल्याचे निष्पन्न झाले! एकाच टोळीतील सदस्य एकमेकांना फसवत होते की हा संपूर्ण एक मोठा कट होता, या विचित्र गुंतागुंतीमुळे पोलीसही थक्क झाले आहेत.

अखेर या सततच्या त्रासाला आणि फसवणुकीला कंटाळून बोराळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्या आदेशाने मुंबई नाका पोलीस ठाण्यात आरोपी सागर पांगरे पाटील याच्यावर खंडणी आणि फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बेग या प्रकरणाचा तपास करत असून, नाशिकमधील या ‘ट्रान्सफर रॅकेट’ची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!