द्वारकेचा वाहतूक कोंडीचा विळखा सुटणार! पोलीस उपायुक्त थेट रस्त्यावर; बेशिस्तांना दिला सज्जड दम!

उपायुक्तांचा ‘ऑन द स्पॉट’ फैसला: द्वारकेतील अवैध पार्किंग, बेशिस्त रिक्षाचालकांना थेट इशारा.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १८ ऑक्टोबर: शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडवणाऱ्या आणि नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीवर अखेर पोलीस यंत्रणा ‘एक्शन मोड’मध्ये आली आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या “TRAFFIC WALK WITH CITIZEN” या अभिनव संकल्पनेतून, पोलीस उपायुक्त (मुख्यालय/वाहतूक) श्रीमती किरीथिका सी. एम. यांनी आज स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. अवैध पार्किंग, बेशिस्त चालक आणि नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांना त्यांनी कडक शब्दात समज दिली असून, द्वारका परिसराला शिस्त लावण्यासाठी एका मोठ्या ‘मास्टर प्लॅन’वर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

आज सकाळी ११ वाजता श्रीमती किरीथिका मॅडम यांनी आपल्या फौजफाट्यासह द्वारका सर्कल येथे धडक दिली. तब्बल तीन तास त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत ट्रॅव्हल्स चालक, टॅक्सीवाले, रिक्षाचालक, दुकानदार आणि सामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी नागरिकांनी वाहतुकीच्या नरकयातनांचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला.

बेशिस्तांना अल्टीमेटम, अवैध पार्किंगला चाप!

श्रीमती किरीथिका मॅडम यांनी बेशिस्त वाहनचालकांची कोणतीही हयगय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत दिले.

ट्रॅव्हल्स चालकांना तंबी: सर्व्हिस रोडवर मनमानीपणे ट्रॅव्हल्स उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या ट्रॅव्हल्स मालकांना, “तुमच्यामुळे वाहतूक खोळंबता कामा नये,” अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

टॅक्सी-खाजगी वाहनांसाठी नवी जागा: टॅक्सी आणि खाजगी वाहनांच्या पार्किंगसाठी द्वारकाच्या अप-रॅम्पखालील जागेचा वापर करण्यासंदर्भात एन.एच.ए.आय.चे अधिकारी श्री. फैजान खान यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच पार्किंगचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

रिक्षाचालकांना इशारा: सिग्नल आणि टर्निंग पॉईंटच्या ५० मीटर परिसरात एकही रिक्षा दिसता कामा नये, असा सज्जड इशारा रिक्षाचालकांना देण्यात आला आहे.

समन्वयातून सुटणार कोंडीचा प्रश्न!

केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता, वाहतूक कोंडीच्या मुळावर घाव घालण्यासाठी विविध यंत्रणांना एकत्र आणण्यावर भर देण्यात आला. बंद अवस्थेत असलेला अंडरपास पुन्हा वापरात आणणे, आवश्यक ठिकाणी वाहतुकीचे चिन्ह लावणे, सिग्नलवर लेन मार्किंग करणे आणि रस्ते खड्डेमुक्त करणे यासाठी एन.एच.ए.आय. आणि महानगरपालिका यांच्यासोबत समन्वय साधण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

या धडक कारवाईवेळी सहायक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे, श्री. सुधाकर सुरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रियाज शेख यांच्यासह द्वारका युनिटचे सर्व अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते. या कारवाईमुळे द्वारका परिसरातील वाहतुकीला लवकरच शिस्त लागेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!