प्रशासकीय कामाला नवी दिशा; अनेक उपक्रम ठरले राज्यासाठी आदर्श
लाल 🚨 दिवा नाशिक,दि.३० :-(आमच्याप्रतिनिधीकडून) नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या आशिमा मित्तल यांची जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. मित्तल यांच्या बदलीमुळे जिल्हा परिषदेतील एका प्रभावी प्रशासकीय पर्वाची सांगता झाली आहे.
आपल्या कार्यकाळात मित्तल यांनी प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणत अनेक महत्त्वपूर्ण आणि लोकाभिमुख निर्णय घेतले. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे नाशिक जिल्हा परिषदेला मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात स्थान मिळाले, हे त्यांच्या कार्याचे मोठे यश मानले जाते. त्यांनी ‘सुपर ५०’ सारखा शैक्षणिक उपक्रम, सीएसआर फंडातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बससेवा आणि दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजना यशस्वीरित्या राबवल्या.
जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम त्यांच्याच कारकिर्दीत पूर्णत्वास गेले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ‘बालस्नेही पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी घेतलेले काही प्रशासकीय निर्णय राज्यासाठी ‘मॉडेल’ ठरले असून राज्य सरकारनेही ते स्वीकारले आहेत.
मित्तल यांच्या बदलीकडे त्यांच्या कामाची पोचपावती आणि बढती म्हणूनच पाहिले जात आहे. त्यांच्या जाण्याने नाशिक जिल्हा परिषदेने एक कर्तृत्ववान अधिकारी गमावला असला तरी, जालना जिल्ह्याला एक कार्यक्षम जिल्हाधिकारी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.







