बिल्डरचा मुजोरपणा! ‘सुविक अ‍ॅस्पायर’च्या बांधकामामुळे नागरिकां व कामगारांचा जीव टांगणीला…… मनपा व कामगार प्रशासन झोपेत ? सुमित चौधरी वर कारवाईची मागणी ?

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि‌.१४:- प्रतिनिधी : नाशिकच्या उच्चभ्रू वस्तीत, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ, एका बिल्डरने कायदाच खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हॉटेल सयाजीमागे सुरू असलेल्या ‘सुविक अ‍ॅस्पायर’ या गगनचुंबी इमारतीच्या बांधकामासाठी विकासक सुमित चौधरी यांनी थेट सार्वजनिक रस्ताच अडवून धरल्याने नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. एकीकडे वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना, दुसरीकडे कामगारांना मृत्यूच्या दाढेत ढकलून हे बांधकाम सुरू असल्याने, “या मुजोरपणाला आवर घालणार कोण?” असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत.

खुल्लमखुल्ला दादागिरी, नागरिकांचा जीव धोक्यात!

गेल्या अनेक महिन्यांपासून या इमारतीचे काम सुरू आहे. सध्या स्लॅब काढण्याचे काम सुरू असल्याचे कारण देत विकासकाने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता रहदारीचा मुख्य रस्ताच बंद केला आहे. रस्त्यावरच सिमेंट मिक्सर, लोखंडी सळ्या आणि इतर बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पसरले आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे, तर पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून धोकादायक परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे. हा प्रकार म्हणजे अपघाताला खुले निमंत्रणच ठरत आहे. “आमच्या पैशावर आलिशान टॉवर उभा करायचा आणि आमचाच रस्ता बंद करायचा, हा कुठला न्याय?” अशी संतप्त प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकाने दिली.

कामगारांच्या जिवाशी खेळ, सुरक्षा वाऱ्यावर!

या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेचा पुरता फज्जा उडाला आहे. कोणत्याही प्रकारची संरक्षक जाळी नाही, कामगारांच्या डोक्यावर हेल्मेट नाही, कमरेला सेफ्टी बेल्ट नाही… अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देत हे मजूर उंच इमारतीवर काम करत आहेत. उद्या येथे एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास या कामगारांच्या मृत्यूला जबाबदार कोण असेल? महापालिकेचे अधिकारी आणि कामगार उपायुक्त या गंभीर प्रकाराकडे सोयीस्करपणे डोळेझाक का करत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासनाचे मौन, बिल्डर लॉबीचे फावले!

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. प्रशासनाच्या या सुस्तपणामुळेच बिल्डरची मनमानी वाढली असून, तो नियमांना केराची टोपली दाखवत आहे. बांधकाम परवानगी देताना घातलेल्या अटी व शर्तींचे सर्रास उल्लंघन होत असतानाही अधिकारी गप्प का? यामागे मोठे आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे.

जर प्रशासनाने या मनमानी कारभारावर तातडीने कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

  •  उत्तर द्या, आयुक्तसाहेब!
  •  सार्वजनिक रस्ता बंद करण्याची परवानगी बिल्डरला कोणी दिली?
  •  कामगारांच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या विकासकावर कारवाई कधी होणार?
  •  वारंवार तक्रारी करूनही अधिकारी गप्प का आहेत?
  •  एखादा अपघात होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का?

  • प्रतिक्रिया

इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. स्लॅब काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान रस्त्यावरील एखाद्या वाहनधारकाला बांबू लागू नये. म्हणून हा रस्ता बंद केलेला आहे. रस्ता हा आमच्या इमारतीच्या हद्दीतच येतो. त्यामुळे महापालिका आवश्यक नाही. विक्रांत जाधव, बांधकाम व्यावसायिक

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!