नाशिकच्या देवळाली हवाई दल केंद्रात ८ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर दीक्षांत सोहळा; महिला अग्निवीरांच्या कवायतींनी जिंकली मने !
लाल 🚨 दिवा नाशिक,दि.०९(आमच्याप्रतिनिधीकडून) भारतीय हवाई दलाच्या ‘मिशन, इंटिग्रिटी आणि एक्सलन्स’ या त्रिसूत्रीचा अंगीकार करत, देशाच्या संरक्षणासाठी सज्ज झालेले २६२ अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थी आज नाशिकच्या देवळाली हवाई दल केंद्रातून दिमाखात बाहेर पडले. मटेरियल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (MMI) येथे आयोजित एका नेत्रदीपक दीक्षांत समारंभात, ८ आठवड्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर हे तरुण योद्धे हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले. या २६२ अग्निवीरांमध्ये ३६ महिला शक्तींचा समावेश असून, त्यांच्या चित्तथरारक कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली.

देवळाली हवाई दल केंद्राचे प्रमुख, एअर कमोडोर मनीष दियालानी यांनी या शानदार संचलनाची मानवंदना स्वीकारली. परेड कमांडर आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या शिस्तबद्ध आणि लयबद्ध संचलनाचे कौतुक करताना त्यांनी प्रशिक्षणाच्या उच्च दर्जाचे कौतुक केले. आपल्या भाषणातून नवोदित अग्निवीरांमध्ये नवा जोश भरताना ते म्हणाले, “ज्ञानाचा भक्कम पाया उभारा, सतत शिकण्याची जिद्द ठेवा आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात हवाई दलाची मूल्ये जपत उत्कृष्टतेचा ध्यास घ्या.” त्यांचे शब्द ऐकून तरुण अग्निवीरांच्या चेहऱ्यावर एक नवी चमक दिसून येत होती.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे महिला अग्निवीर वायू प्रशिक्षणार्थींनी सादर केलेला थरारक कवायती आणि संगीन युद्धाचा (Bayonet Fighting) चित्तथरारक डेमो. त्यांच्या व्यावसायिकतेने आणि शिस्तीने उपस्थितांची मने जिंकली आणि टाळ्यांच्या कडकडाटाने संपूर्ण परिसर दणाणून गेला. या महिला शक्तीचा अदम्य उत्साह पाहून प्रत्येकाच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले.
या गौरवशाली सोहळ्यासाठी हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, इतर लष्करी दलांचे प्रतिनिधी, नागरी क्षेत्रातील मान्यवर आणि हवाई दल केंद्रातील जवान आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशाच्या सेवेसाठी सज्ज झालेल्या या ‘अग्निपुत्रां’च्या कामगिरीचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले…







