पोलिसांचा ‘मास्टरस्ट्रोक’! ३ लाखांच्या ९ मोटरसायकली जप्त, शहरातल्या वाहनचोरांचे धाबे दणाणले!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.९:- (प्रतिनिधी): शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपनगर पोलिसांनी एका मोठ्या आणि तितक्याच धक्कादायक चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अल्पवयीन पुतण्याला हाताशी धरून शहर आणि ग्रामीण परिसरात मोटरसायकल चोरीचा सपाटा लावणाऱ्या एका ‘शातिर’ चुलत्याचा कारनामा उघडकीस आला आहे. पोलिसांनी सापळा रचून विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून तब्बल ३ लाख ५ हजार रुपये किमतीच्या ९ चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईने वाहनचोरांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी ‘स्टॉप अँड सर्च’ आणि नाकाबंदी तीव्र करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर, पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे व सहा. पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयंत शिरसाठ यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला वाहनचोरांचा छडा लावण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, गुन्हे शोध पथकाचे पो.अ. जयंत शिंदे यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीची संशयित गाडी वडनेर परिसरातील एका इसमाकडे असल्याची पक्की खबर मिळताच, पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ सापळा रचला.
पोलीस पथकाने वडनेर परिसरात अत्यंत शिताफीने सापळा लावला. काही वेळातच, एक तरुण चोरीच्या मोटरसायकलवरून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा करताच, त्याने गाडीचा वेग वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच सावध असलेल्या पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता तो विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या बालकाला पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, एक धक्कादायक सत्य समोर आले. आपला चुलता सलीम हुसेन पठाण (रा. गोंदे, ता. इगतपुरी) याच्यासोबत मिळून आपण या चोऱ्या करत असल्याची कबुली त्याने दिली. चुलताच या सगळ्याचा मास्टरमाईंड असून, तो आपल्याला सोबत घेऊन नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून मोटरसायकली चोरायचा, असे त्याने सांगितले. त्याच्या या कबुलीनाम्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एक-एक करत तब्बल ९ मोटरसायकली हस्तगत केल्या.
या कारवाईमुळे उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, मुंबईनाका, घोटी आणि इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि विधीसंघर्षित बालकाचा चुलता सलीम पठाण हा सध्या फरार असून, पोलीस पथके त्याच्या मागावर आहेत. त्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही कौतुकास्पद कामगिरी वपोनि. श्री जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोउनि. श्री प्रभाकर सोनवणे, पोहवा. संदीप पवार, विनोद लखन, पो.अं. जयंत शिंदे, गौरव गवळी, अनिल शिंदे, प्रशांत देवरे, पंकज कर्पे, सुरज गवळी, संदेश रघतवान, सुनील गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक होत आहे







