आयुक्त कर्णिकांचा ‘मास्टरप्लॅन’, उपायुक्त राऊत यांचा ‘ऍक्शन धमाका’! नाशिकच्या ‘पॉवर-जोडी’चा गुन्हेगारीवर थेट प्रहार, ११ कर्दनकाळ जिल्ह्याबाहेर!

गुन्हेगारीमुक्त नाशिक’च्या दिशेने निर्णायक पाऊल; पोलिसांच्या धडक कारवाईने नागरिक निर्धास्त!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१६:- प्रतिनिधी:शहरात दहशत माजवून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत. खुन, दरोडे, जबरी चोरी आणि दहशतीच्या जोरावर आपली पोळी भाजणाऱ्या ११ सराईत गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांनी कायद्याची वज्रमूठ आवळली आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी अत्यंत धडाकेबाज आणि कौतुकास्पद कारवाई करत या ११ गुन्हेगारांना तब्बल दोन वर्षांसाठी नाशिक जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे. पोलिसांच्या या ‘ऑपरेशन क्लीन’मुळे नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली असून, त्यांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या काही काळापासून काही सराईत गुन्हेगारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. खून, खुनाचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, चोरी, दहशत माजवून खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर नोंद होते. तुरुंगातून सुटून आल्यावर पुन्हा तेच गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली होती. आगामी सण-उत्सव आणि महानगरपालिका निवडणुकांच्या काळात हे गुन्हेगार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकतात, ही शक्यता गृहीत धरून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अशा गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांच्या पथकाने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ५५, ५६ व ५७ अंतर्गत या गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार केले. सखोल चौकशी आणि पुराव्यांच्या आधारे, या ११ गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही कारवाई म्हणजे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी उचललेले एक अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी पाऊल मानले जात आहे.

शहराच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

“नाशिककरांची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. कोणताही गुन्हेगार कायद्यापेक्षा मोठा नाही. आगामी काळात सण-उत्सव आणि निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने राबवल्या जातील,” असा स्पष्ट इशारा पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी दिला आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे:

१) आकाश उत्तम गरड (वय ३०)

२) युवराज लडया वाघीले (वय १९)

३) अर्जुन राजु लोट (वय २७)

४) सागर अनिल कुमावत (वय ३३)

५) रूषिकेश बापु पगारे (वय २८)

६) तुषार चंद्रकांत काळे (वय २१)

७) करण राजु लोट (वय २९)

८) रोहित उर्फ खेकड्या गणेश राठोड (वय २४)

९) आतिष पुंडलिक बोडके (वय २३)

१०) सागर मोहन ताते (वय ३४)

११) शोएब सादिक शेख (वय २२)

या कारवाईमुळे परिमंडळ-१ मधून आतापर्यंत एकूण २५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात यश आले आहे. MCOCA आणि MPDA सारख्या कठोर कायद्यांचा वापर करून गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्याचा निर्धार नाशिक पोलिसांनी केला आहे, ज्यामुळे नाशिककर आता निर्भयपणे आणि शांततेत आपले जीवन जगू शकतील.,

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!