बहुतांश घटना कौटुंबिक कलह, पूर्ववैमनस्य आणि आपसांतील संघर्षातून; नाशिक पोलीस प्रशासनाचे स्पष्टीकरण
नाशिक, दि. ४ ऑक्टोबर: शहरात वाढलेल्या खुनाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असले तरी, यातील बहुतांश घटना या संघटित गुन्हेगारी नसून वैयक्तिक, कौटुंबिक वाद आणि आपसांतील संघर्षाचा परिणाम असल्याचे पोलीस प्रशासनाने केलेल्या विश्लेषणात समोर आले आहे. शहरात घडलेली प्रत्येक खुनाची घटना गंभीर असून, पोलीस प्रशासन त्याचा तीव्र निषेध करते. मात्र, या घटनांच्या मुळाशी जाऊन कारणे तपासली असता, ती अधिक सामाजिक आणि वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे दिसून येते, असे स्पष्टीकरण पोलीस प्रशासनाने दिले आहे.
नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शहरात नोंद झालेल्या ४३ खुनांच्या घटनांपैकी तब्बल ४१ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे हे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. यावरून दिसून येते की, गुन्हा घडल्यानंतर आरोपींना शोधून त्यांच्यावर कायद्याचा वचक निर्माण करण्यात पोलीस दल कुठेही कमी पडलेले नाही.
- गुन्ह्यांचे स्वरूप काय सांगते?
शहरात गाजलेल्या खुनाच्या घटनांचे विश्लेषण केले असता, धक्कादायक माहिती समोर येते. यातील जवळपास ६०% घटना या कौटुंबिक कलहातून घडल्या आहेत. यामध्ये पतीने पत्नीचा, पत्नीने पतीचा, मुलाने बापाचा, सुनेने सासूचा किंवा भावाने भावाचा जीव घेतल्याच्या दुर्दैवी घटनांचा समावेश आहे. या घटना चार भिंतींच्या आत घडत असल्याने, त्यावर पोलिसांना थेट नियंत्रण ठेवणे अशक्य होते.
उर्वरित घटना या मित्रांमधील वाद, पैशांची देवाणघेवाण, जुने वैमनस्य, नशेच्या आहारी जाऊन झालेले क्षुल्लक वाद किंवा प्रेमप्रकरणातून घडल्या आहेत. रस्त्यावरील नागरिकांना लक्ष्य करून किंवा दहशतीसाठी झालेल्या खुनांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, आपल्या आसपासच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे व पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पोलिसांची भूमिका आणि नागरिकांची जबाबदारी
“खुनाच्या वाढत्या घटना निश्चितच चिंताजनक आहेत. पण या घटनांचे स्वरूप पाहता, हा कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. राग, तणाव आणि व्यसनाधीनता यातून गुन्हे घडत आहेत. पोलीस दल गुन्हा घडल्यानंतर आरोपींना जेरबंद करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आमची कामगिरी ते सिद्ध करते. पण गुन्हा घडूच नये, यासाठी सामाजिक जागृती आणि कौटुंबिक स्तरावर संवादाची गरज आहे. नाशिककरांनी निर्भय राहावे, पोलीस तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहेत.”
– संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर
पोलिसांची ठोस पाऊले:
शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
कोम्बिंग ऑपरेशन: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नियमित कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात आहे.
गस्त वाढवली: संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, रात्रीच्या वेळी नाकाबंदी अधिक कडक करण्यात आली आहे.
शस्त्र नियंत्रण मोहीम: बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाचा वापर: शहरातील सीसीटीव्ही नेटवर्क अधिक सक्षम करून गुन्हेगारांवर नजर ठेवली जात आहे.
खुनाच्या घटना या आपसी संघर्षातून घडत असल्या तरी, पोलीस प्रशासन आपली जबाबदारी झटकत नाही. मात्र, या सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी नागरिकांचा सहभाग आणि सामाजिक संस्थांचे प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे आहेत, असेही पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.







