लाल 🚨 दिवा-नाशिक:दि. (विशेष प्रतिनिधी) – “येतोय लवकरच भाऊ,”… कारागृहाच्या आतूनच केलेला हा व्हिडीओ आणि बाहेर आल्यावर डीजेच्या तालावर काढलेली मिरवणूक… हे सर्व इन्स्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून व्हायरल करून शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या ‘भाऊ’ आणि त्यांच्या समर्थकांची हवाच उपनगर पोलिसांनी काढून टाकली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आणि त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकून, ज्या परिसरात त्यांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्याच परिसरातून त्यांची पायी धिंड काढत पोलिसांनी ‘कायदा काय असतो’ याचा जबरदस्त ट्रेलर दाखवला आहे.
कारागृहातूनच ‘कमिंग सून’चा ट्रेलर, बाहेर येताच मिरवणुकीचा ‘पिक्चर‘
नाशिक शहरात गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक धक्कादायक इन्स्टाग्राम रील आढळली. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या हत्या (भा.द.वि. ३०२) प्रकरणातील आरोपी राकेश नाना घुमरे हा कारागृहात असताना, त्याची आई त्याला भेटायला गेली होती. त्यावेळी, “येतोय लवकरच भाऊ” अशा आशयाचा एक व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून तो `anilhttps://www.instagram.com/reel/Cvsj6Lpg2TQ/?igsh=dGt2MmI3Mzd3Yjh2` या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल करण्यात आला होता.
यावरच न थांबता, राकेश घुमरे याची जामिनावर सुटका होताच, त्याच्या समर्थकांनी त्याची चक्क मिरवणूक काढली. या मिरवणुकीचे चित्रीकरण करून दहशतीचे रिल्स बनवून पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल केले. कायद्याला खुलेआम आव्हान देणाऱ्या या प्रकाराची वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयंत शिरसाठ यांनी गंभीर दखल घेतली.
कारागृह प्रशासनाच्या कारभाराचे निघाले धिंडवडे!
सर्वात गंभीर प्रश्न हा आहे की, कारागृहासारख्या अतिसुरक्षित ठिकाणी मुलाखतीदरम्यान मोबाईलवरून चित्रीकरण कसे काय केले गेले? गुन्हेगाराला अशी रिल्स बनवण्यासाठी मोबाईल पुरवला गेला का? हे चित्रीकरण होत असताना संबंधित कारागृह प्रशासन झोपले होते का? या गंभीर प्रकारामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपनगर पोलिसांची धडक कारवाई, ‘रील’मधील हिरो झाले ‘झिरो‘
पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जयंत शिरसाठ आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजीव फुलपगारे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने अत्यंत वेगाने तपासचक्रे फिरवत या ‘रील’बाज गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.
यात मुख्य आरोपी राकेश नाना घुमरे (वय २४) सोबत अनिल नाना घुमरे (वय २२), शुभम दिपक कुऱ्हाडे (वय २६), सुशांत विकास सोनार (वय २५), राहुल दिगंबर बोऱ्हाडे (वय २४) आणि साहिल राजेश कुलकर्णी (वय २९) या सहा जणांना अटक करण्यात आली.
ज्या गल्लीत ‘हवा’ केली, त्याच गल्लीत ‘धिंड’ काढली!
उपनगर पोलिसांनी या गुन्हेगारांना केवळ अटक करून समाधान मानले नाही, तर त्यांना कायद्याचा खरा अर्थ समजावला. ज्या जेलरोड परिसरात या आरोपींनी मिरवणूक काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, त्याच परिसरातून पोलिसांनी या सर्वांना पायी फिरवत त्यांची चांगलीच ‘धिंड’ काढली. खाकीचा रुबाब पाहून कालपर्यंत ‘भाईगिरी’ करणाऱ्या या तरुणांची बोलतीच बंद झाली होती. “आम्ही चुकलो, यापुढे असे कधीही करणार नाही आणि इतरांनीही असे कृत्य करू नये,” अशी विनवणी करत त्यांनी पोलिसांसमोर हात जोडले.
या यशस्वी कामगिरीत सपोनि. सुयोग वायकर, पोउनि. प्रभाकर सोनवणे आणि गुन्हे शोध पथकातील सर्व धाडसी अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे सोशल मीडियाचा वापर करून दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना सणसणीत चपराक बसली आहे.







