“आमच्या ताटातलं हिसकावण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा,” धनंजय मुंडेंचा खणखणीत इशारा
“आमचा नेता एकच, छगन भुजबळ!” पडळकरांची जाहीर घोषणा; ओबीसी ऐक्याची वज्रमूठ
येत्या निवडणुकीत बनावट ओबीसींना जागा दाखवा; फक्त ‘ओरिजनल’च चालणार!
रस्त्यावर आणि न्यायालयातही आरपारची लढाई लढणार, आता माघार नाहीच!
लाल 🚨 दिवा-बीड, दि. १७ ऑक्टोबर:बीडचे छत्रपती संभाजी मैदान आज अक्षरशः ओबीसींच्या महासागराने दुमदुमून गेले होते. आरक्षणाच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांविरोधातला संताप, अन्यायाविरुद्ध पेटून उठलेली आग आणि छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात एकवटलेली वज्रमूठ… हे चित्र होते ओबीसी महाएल्गार सभेचे! ‘आमच्या हक्काच्या आरक्षणाच्या मुळावर जे उठले असतील, त्यांना निवडणुकीत आडवे करा!’ अशी सिंहगर्जना करत मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या आरपारच्या लढाईचे रणशिंग फुंकले आणि संपूर्ण मैदानात चैतन्याची एकच लहर उसळली.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी खोट्या नोंदी तयार करून ओबीसींच्या ताटात घुसखोरी करण्याचा डाव आखला जात असल्याचा घणाघाती आरोप करत भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही धारेवर धरले. “आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. जे समाज अजूनही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत, त्यांच्यासाठी ही संजीवनी आहे. खोट्या नोंदी करून, खाडाखोड करून कुणी आमच्या हक्कावर डल्ला मारणार असेल, तर ते कदापि सहन केले जाणार नाही,” असा सज्जड दमच भुजबळ यांनी दिला. “ही लढाई आता फक्त रस्त्यावरची नाही, तर न्यायालयीन आणि राजकीयही आहे. येत्या निवडणुकीत फक्त आणि फक्त ओरिजनल ओबीसी उमेदवारालाच निवडून द्या आणि घुसखोरांना त्यांची जागा दाखवा,” असे आवाहन करताच उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात आणि घोषणांनी त्याला प्रतिसाद दिला.
धनंजय मुंडेंची ‘ताटा’ची भाषा!
माजी मंत्री आणि बीडचे सुपुत्र धनंजय मुंडे यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना ठणकावले. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील गावगाडा आपल्याला चालवायचा आहे, समाजात भांडणं लावायची नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही आमचा हक्क सोडून देऊ. आमच्या ताटातील घास कुणी हिसकावून घेत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. छगन भुजबळ साहेब आमची ताकद आहेत, आता मागे हटायचं नाही!” मुंडेंच्या या वक्तव्याने सभेला वेगळीच धार आली.
पडळकरांनी दिला नेतृत्वाचा कौल!
या सभेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर यांनी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाला दिलेले जाहीर समर्थन. “आमच्यात फूट पाडण्याचे अनेक प्रयत्न झाले आणि होत राहतील, पण सर्वांनी लक्षात ठेवा, संपूर्ण ओबीसी समाजाचा नेता एकच आहे… छगन भुजबळ!” पडळकरांच्या या घोषणेने ओबीसी ऐक्यावर शिक्कामोर्तब केले. “प्रस्थापित मराठा ओबीसी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना आमचा सक्त विरोध आहे,” असेही त्यांनी निक्षून सांगितले.
एकाच मंचावर ओबीसी नेत्यांचा एकच सूर!
या महाएल्गार सभेला प्रकाश शेंडगे, शब्बीर अन्सारी, लक्ष्मण हाके, लक्ष्मण गायकवाड, राजाराम पाटील यांच्यासह विविध ओबीसी, भटके-विमुक्त, मुस्लिम ओबीसी, आगरी, लिंगायत अशा समाजातील नेत्यांनी एकाच सूरात आरक्षणाच्या संरक्षणाची शपथ घेतली.
एकंदरीत, बीडच्या या महाएल्गार सभेने केवळ सरकारलाच नव्हे, तर ओबीसी आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या सर्वांनाच एक सणसणीत इशारा दिला आहे. रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन संघर्ष आणि निवडणुकीच्या मैदानात दाखवली जाणारी ताकद, या त्रिसूत्रीच्या आधारे ओबीसी समाज आपल्या हक्कांसाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्याचे या विराट सभेने दाखवून दिले आहे.







