पोलिसांच्या बुद्धीचातुर्यापुढे चोराचे काहीच चालेना; विश्वासात घेऊन काढली गुन्ह्यांची कबुली!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२९ (विशेष प्रतिनिधी):शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा देत, अंबड पोलिसांनी एका मोठ्या कामगिरीत सराईत अल्पवयीन वाहनचोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अत्यंत हुशारीने आणि गुप्त माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यात हा विधी संघर्षित बालक अलगद अडकला. त्याच्याकडून तब्बल चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंबड, आडगावसह इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१९ जुलै ते २० जुलै २०२५ दरम्यान अंबड गावातील पूनम हॉटेल परिसरातून सिद्धार्थ ज्ञानकर यांची एम.एच.१५-सी.एच.९२७१ क्रमांकाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी २२ जुलै रोजी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा (गुरंन. ४८६/२०२५) दाखल करण्यात आला होता. शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपआयुक्त श्री. किशोर काळे, आणि सहाय्यक आयुक्त श्री. शेखर देशमुख यांनी दिलेल्या कडक सूचनांनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे चक्र वेगाने फिरवण्याचे आदेश दिले.
गुन्हे शोध पथक आरोपीचा माग काढत असताना, पथकातील अत्यंत दक्ष आणि अनुभवी पोलीस अंमलदार सचिन करंजे व अनिल गाढवे यांना त्यांच्या विश्वासू गुप्त खबऱ्याकडून एक पक्की माहिती मिळाली. चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी एक तरुण सिडकोतील शिंपी मंगल कार्यालयाच्या परिसरात येणार असल्याची ती माहिती होती. क्षणाचाही विलंब न लावता, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी संशयित विधी संघर्षित बालक येताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला चोरीच्या मोटारसायकलसह रंगेहाथ पकडले.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या अल्पवयीन चोराला गुन्हे शोध पथकाने विश्वासात घेऊन आपल्या बुद्धीचातुर्याने आणि पोलिसी खाक्या दाखवत बोलते केले. काही वेळातच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने केवळ अंबडमधीलच नव्हे, तर आडगाव, इंदिरानगर आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथूनही मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनाम्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून एकूण चार मोटारसायकली हस्तगत केल्या.
जप्त केलेला मुद्देमाल आणि उघडकीस आलेले गुन्हे:
1. एम.एच.१५-सी.एच.९२७१ (हिरो स्प्लेंडर): अंबड पोलीस ठाणे गुन्हा (किंमत रु. १०,०००/-)
2. एम.एच.१५-ई.यु.४५४८: आडगाव पोलीस ठाणे गुन्हा (किंमत रु. ४०,०००/-)
3. एम.एच.१५-ई.एफ.८४०१ (ॲक्टिवा): (किंमत रु. ३०,०००/-)
4. एम.एच.०९-ए.एस.१४५३ (हिरो होंडा सीडी डॉन): (किंमत रु. १०,०००/-)
या कारवाईमुळे अंबड आणि आडगाव पोलीस ठाण्यातील दोन मोठे गुन्हे उघड झाले असून, एकूण १,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
कौतुकास्पद कामगिरी !
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शोध पथकाचे सपोनि. विलास पडोळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने (योगेश देसले, राहुल जगझाप, सचिन करंजे, अनिल गाढवे, तुषार मते, मयुर पवार, संजय सपकाळे, फरीद इनामदार, संदीप भुरे, सागर जाधव, समाधान शिंदे, प्रवीण राठोड, केशव ढगे, वैभव एखंडे, राकेश पाटील, दीपक निकम) ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या या तत्परतेमुळे आणि कौशल्यामुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले असून, नाशिककरांच्या मनात पोलिसांप्रति विश्वास अधिक दृढ झाला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक टोपले करत आहेत.







