महाराष्ट्र ते आंध्र प्रदेशात गुन्हेगारीचे जाळे; खून, दरोडा, चोरीच्या अनेक गुन्ह्यांतील सराईत आरोपी अखेर गजाआड
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३१ :- शहरात दहशत माजवणाऱ्या सोनसाखळी चोरांना लगाम घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी कंबर कसली असून, एका मोठ्या आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आले आहे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेला अट्टल सराईत गुन्हेगार वैभव नारायण अडोळे (वय-२५, रा. अमरावती) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सोनसाखळी चोरीचे ०२, मोटार सायकल चोरीचा ०१ आणि इतर ०२ पाहिजे आरोपींचे गुन्हे असे एकूण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

एका सीसीटीव्ही फुटेजने लावला माग
दिनांक २८/०७/२०२५ रोजी उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटा पसार झाला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांनी या गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याचे आदेश दिले होते.
गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची अक्षरशः पिंजून काढणी केली असता, एक इसम मोटार सायकलवरून महिलेच्या गळ्यातील चैन ओढून पळ काढताना दिसून आला. तोच धागा पकडून पोलिसांनी आरोपीच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नाशिकरोड बस स्टँडमार्गे पुणे जिल्ह्यातील चिंचवड भागात लपल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.
फिल्मी स्टाईल पाठलाग आणि अटक
माहिती मिळताच, गुन्हे शाखा युनिट २ चे सपोनि डॉ. समाधान हिरे, सपोउनि शंकर काळे, पोहवा मनोहर शिंदे, पोअंम तेजस मते, जितेंद्र वजीरे यांचे पथक पुण्यात दाखल झाले. सलग दोन दिवस अहोरात्र परिश्रम करून पथकाने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. गुप्त बातमीदाराकडून आरोपी पिंपरी चिंचवड परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने तेथून धूम ठोकली. पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे एक किलोमीटरच्या थरारक पाठलागानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला पकडून जेरबंद केले.
चौकशीत गुन्ह्यांचा डोंगर उघड
पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने आपले नाव वैभव नारायण अडोळे असल्याचे सांगितले. पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने नाशिकमधील गुन्ह्यासह इतर अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या कबुलीवरून खालील गुन्हे उघडकीस आले:
1. उपनगर पोलीस ठाणे, नाशिक येथील सोनसाखळी चोरी.
2. तोफखाना पोलीस ठाणे, अहिल्यानगर येथील सोनसाखळी चोरी.
3. सिडको पोलीस ठाणे, छ. संभाजीनगर येथील मोटार सायकल चोरी.
4. एस.बी. पोलीस ठाणे, जालना येथील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी.
5. मोर्शी पोलीस ठाणे, अमरावती (ग्रामीण) येथील गुन्ह्यातील पाहिजे आरोपी.
आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहून पोलीसही चक्रावले
आरोपी वैभव अडोळे हा केवळ किरकोळ चोर नसून अट्टल सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातील अमरावती, वर्धा, नागपूर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर येथे खून, जबरी चोरी, घरफोडी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक म्हणजे, आंध्र प्रदेशात एका बँकेवर दरोडा टाकून तब्बल ३.५ किलो सोने आणि मोठी रोख रक्कम चोरल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.
गुन्हे शाखा युनिट २ ची कौतुकास्पद कामगिरी
ही धाडसी कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, पोउनि प्रभाकर सोनवणे, सपोउनि बाळु शेळके, विलास गांगुर्डे, शंकर काळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने यशस्वी केली. या मोठ्या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.







