अंबड पोलिसांचा दणका, चेन स्नॅचिंग आणि चोरीच्या घटनांवर यशस्वी कारवाई

दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड, २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त

लाल दिवा-नाशिक,दि.१३:-: अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अथक परिश्रम आणि चातुर्याच्या बळावर चेन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये यश मिळवले आहे. या कारवाईत एकूण २ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन्ही घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली आहे.

माऊली लॉन्सजवळील घटना:

१९ जून २०२५ रोजी संध्याकाळी माऊली लॉन्स परिसरात फिरणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मोटारसायकलस्वार दोन चोरट्यांनी हिसकावून नेले होते. या घटनेनंतर अंबड पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीसह गुप्तहेरांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आदित्य एकनाथ सोनवणे (वय २५, रा. झापवाडी, सिन्नर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने केवळ हीच नव्हे तर आणखी एका चेन स्नॅचिंगची घटनाही कबूल केली. त्याच्याकडून २ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

आयोध्या नगरमधील घरफोडी:

११ जून २०२५ रोजी आयोध्या नगरमधील एका घरातून लॅपटॉप आणि मोबाईल चोरीला गेला होता. या घटनेची तक्रार दाखल होताच अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक कामाला लागले. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करत आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने ईश्वर वाल्मिक पाटील (वय २७, रा. खुटवडनगर, नाशिक) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांचे कौतुक:

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार आणि गुन्हे शोध पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या यशस्वी कारवाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोउपनि संदेश पाडवी पुढील तपास करीत आहेत. या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!