प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर! नाशिक तालुक्यात ‘महसूल पंधरवड्या’चा धडाकेबाज शुभारंभ!

वर्षानुवर्षे बंद असलेला शिवार रस्ता अखेर मोकळा; २०० हून अधिक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललं हसू!

लाल 🚨 दिवा-वाडगाव,२० (नाशिक): शासकीय योजना म्हणजे केवळ फिती कापणे आणि भाषणबाजी, हा समज नाशिक तहसील प्रशासनाने अक्षरशः धुळीस मिळवला आहे. ‘महसूल पंधरवडा’ कार्यक्रमाचे उद्घाटन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आणि अनेक वर्षांपासूनची डोकेदुखी ठरलेला शिवार रस्ता मोकळा करून करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी मा. अर्पिता ठुबे आणि तहसीलदार मा. पंकज पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गात आनंदाची लाट उसळली आहे.

मौजे वाडगाव येथे ‘महसूल पंधरवडा’ कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सर्व प्रशासकीय फौजफाटा जमला होता. मात्र, नेहमीप्रमाणे कार्यालयात कार्यक्रम न करता, अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा थेट साडगाव-वाडगाव-गिरणारे येथील वादग्रस्त रस्त्याकडे वळवला. अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे आणि वादामुळे बंद असलेल्या या रस्त्यामुळे सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांना आपल्याच शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. प्रशासनाने क्षणाचाही विलंब न लावता हा रस्ता मोकळा करून दिला, तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “आमच्यासाठी आज दिवाळी दसरा आहे,” अशी भावनिक प्रतिक्रिया एका वृद्ध शेतकऱ्याने दिली.

या ऐतिहासिक क्षणी सहाय्यक जिल्हाधिकारी मा. अर्पिता ठुबे, तहसीलदार मा. पंकज पवार यांच्यासोबत नायब तहसीलदार श्रीमती सुनीता पाटील, पुरवठा अधिकारी विलास कनोजे, महसूल सहाय्यक तुषार वाघेरे, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन गायकर, सरपंच सुरेश पारधी (साडगाव), सरपंच किरण कोरडे (गिरणारे), मंडळ अधिकारी श्रीमती प्रिती अग्रवाल आणि तलाठी प्रिया चौधरी, प्रदीप इंजे, प्रमोद राऊत, अनिता जगताप, सागर पवार यांच्यासह संपूर्ण तहसील कार्यालयाचे पथक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदारांचे शेतकऱ्यांना थेट आवाहन

यानंतर मौजे गिरणारे येथे आयोजित जनजागृती कार्यक्रमात तहसीलदार पंकज पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. ते म्हणाले, “महसूल पंधरवडा हा केवळ एक शासकीय उपचार नाही, तर तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आलेली सुवर्णसंधी आहे. सातबारा दुरुस्ती असो किंवा इतर कोणतेही महसुली काम, न घाबरता पुढे या, आम्ही तुमच्यासाठीच येथे आहोत.” त्यांच्या या आश्वासक शब्दांनी शेतकऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. प्रशासनाच्या या लोकाभिमुख आणि वेगवान कार्यामुळे ‘सरकार आपल्या दारी’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने सत्यात उतरल्याचे चित्र दिसत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!