आडगाव पोलिसांचा ‘झारखंड पॅटर्न’ उद्ध्वस्त! गर्दीत हातसफाई करणारा सराईत मोबाईल चोरटा जेरबंद; तब्बल २ लाखांचा मुद्देमाल जप्त!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाची धाडसी कारवाई; नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१३:-प्रतिनिधी:शहरातील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या खिशावर डल्ला मारून महागडे मोबाईल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आडगाव पोलिसांना मोठे यश आले आहे. भाजी बाजारातील गर्दीचा फायदा घेत एका ज्येष्ठ नागरिकाचा तब्बल १ लाख ३० हजारांचा मोबाईल चोरणाऱ्या झारखंडच्या सराईत चोरट्याला आडगाव पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीचे इतर मोबाईलदेखील हस्तगत करण्यात आले असून, एकूण २ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

पंचवटीतील रहिवासी असलेले ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्री. अरुण शंकर जेजुरकर हे दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सिध्दीविनायक चौकातील भाजी बाजारात खरेदीसाठी गेले होते. गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या शर्टच्या वरच्या खिशातून डोळ्यादेखत हातसफाई करत तब्बल १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ‘हॉनर मॅजिक V-3’ हा महागडा मोबाईल लंपास केला. काही क्षणातच हा प्रकार लक्षात आल्याने श्री. जेजुरकर यांनी तात्काळ आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस नि

रीक्षक श्री. उमेश पाटील यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती संगिता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. जगदाळे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली.

पोलीस हवालदार वाघ आणि पोलीस कॉन्स्टेबल गोसावी यांनी आपल्या गुप्त खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. त्यांना माहिती मिळाली की, त्याच परिसरात एक संशयित इसम पुन्हा फिरत आहे. क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी तातडीने सापळा रचला. संशयितरित्या फिरणाऱ्या इसमास ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. मोहम्मद शेख (रा. झारखंड) असे नाव सांगणाऱ्या या चोरट्याने गुन्ह्याची कबुली दिली.

एका चोरीच्या तपासात लागला मोबाईलच्या खजिन्याचा शोध!

पोलिसांनी मोहम्मद शेखची झडती घेतली असता त्यांच्या डोळे विस्फारले. त्याच्याकडे फिर्यादीच्या महागड्या मोबाईलसह इतर कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन सापडले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण २ लाख ५ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल फोन जप्त केले. यात रेड मी, रिअल मी, व्हिवो, टेक्नो आणि ओप्पो कंपन्यांच्या मोबाईलचा समावेश आहे.

ही कौतुकास्पद कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि श्री. जगदाळे, पोहवा दादासाहेब वाघ, पोहवा इम्रान शेख, पोहवा मनोज परदेशी, पोलीस अंमलदार अक्षय गोसावी, विकास भुजबळ, पडोळ आणि मपोकों वैशाली महाले यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे आडगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!