चोरीचा मोबाईल विकण्याचा प्रयत्न फसला; हत्या, दरोडा, घरफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांची मालिका उघड.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८: शहरात गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्थापन केलेल्या अंबड गुन्हे शाखेने आपल्या धडाकेबाज कामगिरीचा श्रीगणेशा केला आहे. चोरीचा एक मोबाईल विकण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत पोलिसांनी त्याच्या नावावरील तब्बल १६ गंभीर गुन्ह्यांची मालिकाच उघडकीस आणली आहे. महेश बळीराम शिरसाठ (वय ३३) असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे अनेक प्रलंबित गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अंबड गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना त्यांच्या गुप्त खबऱ्याकडून एक ‘पक्की टीप’ मिळाली. एक सराईत गुन्हेगार चोरीचा मोबाईल विकण्यासाठी गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ सापळा रचला.
दुपारी १ वाजण्याच्या सुमारास, ठरलेल्या ठिकाणी एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता झडप घालून त्याला ताब्यात घेतले. महेश शिरसाठ असे नाव सांगणाऱ्या या इसमाची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एक ओपो कंपनीचा मोबाईल, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि एक चांदीची चेन असा एकूण २०,१०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.
पोलिसांनी खाक्या दाखवताच महेश पोपटासारखा बोलू लागला. त्याने सप्टेंबर महिन्यात दारूच्या नशेत ध्रुवनगर परिसरातील एका बंद रो-हाऊसचे कुलूप तोडून चोरी केल्याची कबुली दिली. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आधीच गुन्हा दाखल होता, जो आता उघडकीस आला आहे.
गुन्हेगारीचा जुना ‘खिलाडी’!
चौकशीदरम्यान जे सत्य समोर आले, ते पाहून पोलीसही चक्रावले. महेश शिरसाठ हा कोणी साधासुधा चोर नसून सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर नाशिक शहरातील सातपूर, गंगापूर, सरकारवाडा, भद्रकाली, नाशिकरोड पोलीस ठाण्यांसह सटाणा आणि चाळीसगाव येथेही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये साध्या चोरीपासून ते घरफोडी, दरोड्याची तयारी आणि अगदी खुनासारख्या (भद्रकाली पोलीस ठाणे, कलम ३०२) गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेचे वपोनि. जग्वेंद्रसिंग राजपूत, पोउनि. मोतीलाल पाटील आणि त्यांच्या पथकातील प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भुषण सोनवणे, भगवान जाधव, चारूदत्त निकम, सविता कदम तसेच गंगापूर पोलीस ठाण्याचे मच्छिंद्र वाकचौरे व गांगुर्डे यांनी केली. या मोठ्या कारवाईमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले असून, शहरातील गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे.







