वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘द्वारका’ आता स्वतंत्र वाहतूक युनिट!

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मोठा निर्णय; ३४ पोलिसांच्या पथकासह तीन शिफ्टमध्ये होणार वाहतुकीचे नियोजन

लाल 🚨 दिवा-नाशिक:दि.२४:-शहरातील वाहतुकीची मुख्य धमनी असलेल्या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीची समस्या आता कायमची सुटण्याच्या मार्गावर आहे. येथील सर्कल काढूनही वाहतुकीची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने, नाशिकचे पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी या समस्येवर प्रभावी तोडगा काढत ‘द्वारका’ येथे स्वतंत्र वाहतूक युनिट स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

द्वारका सर्कल येथे मोठ्या प्रमाणात होणारी रहदारी आणि त्यामुळे वारंवार निर्माण होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, पूर्वीचे मनुष्यबळ अपुरे पडत होते. यापूर्वी येथे केवळ १ अधिकारी आणि ९ अंमलदार दोन शिफ्टमध्ये कार्यरत होते. मात्र, आता या समस्येचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांनी ‘द्वारका’ हे स्वतंत्र वाहतूक युनिट स्थापन केले आहे.

या नव्या स्वतंत्र युनिटसाठी तब्बल ३४ अधिकारी व अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये १ पोलीस निरीक्षक, १ सहायक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक आणि ३० वाहतूक पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. या युनिटचे प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. दिनकर कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यासोबत सहायक पोलीस निरीक्षक यतिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पठाण हे काम पाहतील.

या नव्या रचनेनुसार, द्वारका सर्कल येथे आता तीन शिफ्टमध्ये वाहतूक नियमन केले जाणार आहे. सकाळी ८ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री ९ आणि रात्री ९ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत, प्रत्येक शिफ्टमध्ये १ अधिकारी आणि १० अंमलदार तैनात असतील. यामुळे दिवसाच्या प्रत्येक महत्त्वाच्या वेळी वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल. तसेच, कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र पोलीस निरीक्षकांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

“द्वारका येथे स्वतंत्र वाहतूक युनिट स्थापन केल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन होऊन कोंडीची समस्या सोडवण्यासाठी निश्चितच मोलाची मदत होईल,” असा विश्वास पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) श्री. चंद्रकांत खांडवी यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे द्वारका परिसरातील वाहतुकीला शिस्त लागणार असून, नाशिककरांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!