इन्स्टाग्रामवर जीवघेण्या धमकीचा ‘व्हिडिओ’; तडीपार गुंडासह तिघांच्या टोळीला बेड्या!

गंगापूर पोलीस आणि खंडणीविरोधी पथकाची संयुक्त धडक कारवाई; नाशिक शहरात खळबळ.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २२ (विशेष प्रतिनिधी):सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून एका कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी देत दहशत माजवणाऱ्या तडीपार गुंडासह त्याच्या दोन साथीदारांच्या गंगापूर पोलीस आणि खंडणीविरोधी पथकाने संयुक्त कारवाईत मुसक्या आवळल्या आहेत. शहरातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार राहुल पवार यानेच हे कटकारस्थान रचले होते. या अटकेमुळे नाशिकमधील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अशोकस्तंभ येथील रहिवासी अर्जुन संपतराव पगारे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत एक धक्कादायक तक्रार दाखल केली. त्यांचे ओळखीचे असलेले राहुल पवार, अॅडी धांडे आणि एकनाथ तिटकारे यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून राग मनात धरून तक्रारदार व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. केवळ कट रचून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पगारे कुटुंबाच्या मनात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एक धमकीवजा व्हिडिओ तयार केला.

आरोपी राहुल जाधव याने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला. या व्हिडिओमध्ये तक्रारदार यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची थेट धमकी देण्यात आली होती. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरात भीतीचे वातावरण पसरले.

  • पोलिसांची चक्रे फिरली, रात्रीतच रचला सापळा!

मुख्य सूत्रधार राहुल पवार हा शहरातून तडीपार असल्याची गंभीर बाब समोर येताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. तक्रारदाराच्या जीविताला धोका लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ वरिष्ठांची परवानगी मिळवली आणि गंगापूर पोलीस व खंडणी विरोधी पथकाची संयुक्त टीम तयार केली.

पथकाने क्षणाचाही विलंब न लावता आरोपींच्या शोधासाठी चक्रे फिरवली. रात्रीच्या अंधारात गोवर्धन गावात सापळा रचून मुख्य आरोपी आणि तडीपार गुंड राहुल मच्छिंद्र पवार (वय ३२) याला जेरबंद केले. त्यानंतर त्याचे साथीदार योगेश उर्फ अॅडी चंद्रकांत धांडे (वय ३२) याला ओझर येथील घरातून, तर तिसरा आरोपी एकनाथ उर्फ एक्का किसन तिटकारे (वय ३२) याला इगतपुरी तालुक्यातील घोटी येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई अवघ्या काही तासांत पूर्ण करत तिन्ही आरोपींना गजाआड केले.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन करत आहेत.

https://www.facebook.com/share/p/15hDP3EvCd/

  • पोलिसांच्या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, परिमंडळ-१ च्या उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त श्री. नितीन जाधव व श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कारवाईत सहभागी पथक:

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. निखिल पवार, पोउनि. मोतीलाल पाटील आणि खंडणी विरोधी पथकाकडील पोउनि. सगळे, भोई यांच्यासह पोलीस हवालदार, पोलीस नाईक व अंमलदारांच्या मोठ्या फौजफाट्याने ही कामगिरी यशस्वी केली. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!