गोरगरिबांच्या आरोग्याचे कैवारी : मुख्यमंत्री सहायता निधी ठरतोय आशेचा किरण!

नाशिक जिल्ह्यात ९ कोटी ६९ लाखांचे अर्थसाहाय्य; हजारो रुग्णांना जीवदान

लाल 🚨 दिवा-नाशिक,२१:- (प्रतिनिधी) :पैशाअभावी कोणताही गरजू रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील संकल्पनेतून साकारलेला ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष’ आज हजारो कुटुंबांसाठी देवदूत ठरत आहे. राज्यातील गोरगरिबांच्या चेहऱ्यावर निरोगी हास्य फुलावे, यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल म्हणजे रुग्णांच्या अंधकारमय आयुष्यात पेटवलेली आशेची पणतीच म्हणावी लागेल. नाशिक जिल्ह्यात या योजनेच्या माध्यमातून आरोग्याची नवी पहाट उगवली असून, आतापर्यंत हजारो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळाली आहे.

मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आणि मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हा मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळमजल्यावर हा कक्ष एखाद्या मंदिराप्रमाणे गरजू रुग्णांच्या सेवेत २४ तास कार्यरत आहे. जानेवारी २०२५ पासून आजतागायत, या कक्षाने नाशिक जिल्ह्यातील तब्बल १ हजार ४८ रुग्णांच्या जीवनात आरोग्यपर्व आणले असून, त्यांच्या उपचारांसाठी ९ कोटी ६९ लाख २४ हजार रुपयांचा निधी थेट रुग्णालयांना वितरित केला आहे. ही आकडेवारी केवळ संख्या नसून, आजाराच्या खाईत लोटलेल्या हजारो रुग्णांना मिळालेला जीवनदायी दिलासा आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, १ मे २०२५ रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री, श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते या कक्षाचे औपचारिक उद्घाटन झाले. जिल्हाधिकारी श्री. जलज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आणि कक्षाचे प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. चैतन्य बैरागी हे समन्वयक म्हणून रुग्णांसाठी अक्षरशः धावून जात आहेत.

मदतीचा महामेरू

महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ न मिळू शकलेल्या रुग्णांसाठी हा निधी वरदान ठरत आहे. या कक्षाद्वारे रुग्णाच्या वैद्यकीय कागदपत्रांची अत्यंत वेगाने पडताळणी करून निधी थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केला जातो, ज्यामुळे उपचारांना विलंब लागत नाही. अगदी अलीकडेच, रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका २० वर्षीय तरुणीच्या पायाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी १ लाख रुपयांची मदत तात्काळ उपलब्ध करून देत या कक्षाने तिच्या कुटुंबाला मोठा आधार दिला.

या’ गंभीर आजारांवर मिळतेय मात!

मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून खालील २० प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचारासाठी अर्थसाहाय्यरुपी संजीवनी मिळत आहे:

  • हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस व अस्थिमज्जा प्रत्यारोपण
  •  कर्करोग (शस्त्रक्रिया व औषधोपचार)
  • मेंदूचे विकार आणि हृदयरोग
  •  गुडघे व खुब्याचे प्रत्यारोपण
  • रस्ते अपघात आणि भाजलेले रुग्ण
  • नवजात शिशूंचे गंभीर आजार
  •  डायलिसिस

परदेशातूनही मदतीचा ओघ

पूर्वी केवळ देशांतर्गत देणगीदारांकडून या निधीला मदत मिळत असे. मात्र आता एफसीआरएची (FCRA) मान्यता मिळाल्याने परदेशातील दानशूर व्यक्ती आणि संस्थाही या पवित्र कार्यात आपले योगदान देऊ शकत आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या जागतिक पातळीवरील प्रयत्नांचेच फळ आहे.

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील या कक्षात डॉ. बैरागी यांच्यासह समाजसेवा अधीक्षक श्री. प्रकाश भोये आणि आरोग्य विस्तार अधिकारी श्री. विठ्ठल पाटील हे रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांची ही सेवावृत्ती खऱ्या अर्थाने ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या उक्तीला सार्थ ठरवत आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क:

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!