‘एक जिल्हा, एक उत्पादन- २०२४’ पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी; राज्याला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक

लाल 🚨 दिवा-दि.१५ नवी दिल्ली,  ‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैर-कृषी क्षेत्रातील आपल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत. सोमवारी येथील भारत मंडपमध्ये राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) २०२४ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद उपस्थित होते. महाराष्ट्राने उत्पादनांच्या नाविन्यपूर्णतेने, उच्च दर्जाने आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

महाराष्ट्राची ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ उपक्रमात सुवर्ण कामगिरी

‘एक जिल्हा, एक उत्पादन’ (ODOP) उपक्रम हा भारत सरकारचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांना प्रोत्साहन देऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि जागतिक बाजारपेठेत त्यांचा ठसा उमटवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. २०२४ च्या पुरस्कार समारंभात महाराष्ट्राने विविध श्रेणीत पुरस्कार मिळवले. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले. परदेशातील भारतीय दूतावासांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यानेही सुवर्णपदक मिळवले. राज्याच्यावतीने उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कृषी क्षेत्रातील महाराष्ट्राचे यश

महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आपली आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवून दिली आहे.

नाशिकच्या द्राक्षे आणि मनुकांना विशेष उल्लेख पुरस्कार:नाशिकने द्राक्षे आणि मनुकांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणी अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला. नाशिकच्या द्राक्षांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्णपदक: ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला आहे. कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी पुरस्कार स्वीकारला.

नागपूरी संत्र्यांना रौप्यपदक: नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले. रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला.

अमरावतीच्या मंदारिन संत्र्यांना कांस्यपदक: अमरावती जिल्ह्याने मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. अमरावती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी कांस्यपदकाचा पुरस्कार स्वीकारला.

गैर-कृषी क्षेत्रातील यश

अकोला जिल्ह्याने गैर-कृषी क्षेत्रातील ‘ब’ श्रेणी अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला. हा पुरस्कार जिल्हा उद्योग केंद्र, अकोल्याचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!