• “मी तर फक्त साधा शिपाई!” आरोपीचा न्यायालयात ‘गरीब बिच्चारा’ आव; पोलिसांच्या तपासाने मुखवटा टराटरा फाडला!
• नाशिक पोलिसांची ‘खाकी’ नजर ठरली भारी; भूतकाळातल्या बोगस सह्यांनी २ कोटी हडपण्याचा ‘टाईम ट्रॅव्हल’ फसला!
• मुख्याध्यापकांचा स्वाभिमानी नकार अन् पोलिसांचा भक्कम पंचनामा; शिक्षण क्षेत्रातील ‘वसुली सम्राटां’चे धाबे दणाणले!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१६:- (विशेष प्रतिनिधी): शाळेतल्या शिपायाचे काम काय? तर घंटा वाजवणे आणि कागदपत्रे इकडून तिकडे नेणे! परंतु, शिक्षण क्षेत्रात भल्याभल्या मास्तरांना न जमलेली “अर्थपूर्ण” किमया एका शिपायाने करून दाखवली आणि नाशिक पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने हा संपूर्ण काळाबाजार चव्हाट्यावर आणला. नाशिक विभागाला हादरवून सोडणाऱ्या कुख्यात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात नाशिक रोड पोलिसांनी असा काही तपासाचा फास आवळला आहे की, संशयित आरोपी अमोल रमेश कुलकर्णी याने मुंबई उच्च न्यायालयात घेतलेली धाव सपशेल तोंडघशी पडली आहे. मा. न्यायमूर्ती माधव जे. जामदार यांनी पोलिसांचा अचूक तपास आणि ठोस पुरावे पाहून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज थेट कचऱ्याच्या टोपलीत भिरकावून दिला!
२ कोटींचा गंडा घालणारा अजब ‘टाईम ट्रॅव्हल’!
नाशिक पोलिसांच्या प्राथमिक तपासातच या घोटाळ्याची अशी अजब कथा समोर आली, जी ऐकून सिनेमाच्या पटकथा लेखकांनाही घाम फुटेल! सन २०२२ ते २०२४ या काळात झालेल्या नियुक्त्या थेट २०१४ ते २०१७ च्या दाखवून शासनाकडून तब्बल ९६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कोट्यवधींची थकबाकी लाटण्याचा सपाटा सुरू होता. मुक्ताईनगरच्या एम. एफ. तराळ विद्यालयातील १७ जणांच्या नावावर तब्बल २ कोटींहून अधिक रुपयांवर डल्ला मारण्याची संपूर्ण सोय झाली होती. पण, म्हणतात ना ‘गुन्हेगार कितीही हुशार असला तरी कायद्याचे हात लांब असतात’, नेमके तसेच घडले. नाशिक पोलिसांनी या ‘टाईम ट्रॅव्हल’ करणाऱ्या महाभागांची पोलखोल करत शासनाची तिजोरी लुटण्यापासून वाचवली.
: शिपायाचा पगार हजार, अन् कारनामे दोन कोटींचे!
न्यायालयात जेव्हा अमोल कुलकर्णी याच्या वकिलांनी, “माझा पक्षकार तर केवळ शिपाई आहे, साहेबांनी सांगितले म्हणून त्याने कागद नेऊन दिले,” असा अत्यंत केविलवाणा युक्तिवाद केला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्यांना हसू आवरणे कठीण झाले असावे! पगाराच्या पावतीवर शिपाई असणारा माणूस कोट्यवधींच्या फायली फिरवतो, मुख्याध्यापकांवर सह्यांसाठी दबाव आणतो आणि कर्मचाऱ्यांकडून लाखांच्या लाखांची रोखड वसूल करतो; हा कुठला ‘कर्तव्यदक्ष शिपाई’? असा उपरोधिक सवाल नाशिक पोलिसांनी आपल्या तपासातून न्यायालयात उपस्थित केला. तत्कालीन मुख्याध्यापक रामदास पाटील यांनी बोगस सह्या करण्यास दिलेला नकार आणि पोलिसांनी जोडलेले इतर भक्कम साक्षीदार यामुळे कुलकर्णीचा हा ‘निष्पाप शिपाईगिरीचा’ बुरखा क्षणात फाटला.
नाशिक पोलिसांचा ‘सिंघम’ स्टाईल दणका!
नाशिक रोड पोलिसांनी ज्या तडफेने आणि कागदोपत्री बिनतोड पुराव्यांची मांडणी उच्च न्यायालयात केली, त्यामुळे आरोपीला पळता भुई थोडी झाली आहे. आता जामीन फेटाळल्यामुळे या ‘अर्थपूर्ण’ शिपायाच्या आणि त्याच्या मागच्या पडद्यामागच्या धन्यांच्या मुसक्या आवळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आर्थिक गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या नाशिक पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे, प्रामाणिक शिक्षक वर्गात आणि जनतेत पोलिसांविषयी आदराची भावना अधिकच दुणावली आहे.






