चांदोरी, आडगाव, लाखलगावमधील दरोड्यांचा उलगडा; पोलिसांची शर्थ
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि११ : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कृषी औषध दुकानांमध्ये दरोडे टाकणाऱ्या टोळीला यशस्वीपणे जेरबंद केले आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
४ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांदोरी त्रिफुली येथील सत्यम कृषी भांडार या दुकानात दरोडा पडला होता. या दरोड्यात बुरशीनाशके, किटकनाशके, तणनाशके, सोन्याचे ब्रेसलेट आणि रोख रक्कम असा २,४३,२८९ रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. पोलीस निरीक्षक रविंद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या पथकात पोलीस अंमलदार हेमंत गरूड, सचिन धारणकर, माधव साळे, प्रितम लोखंडे, धनंजय शिलावटे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आणि नितीन गांगुर्डे यांचा समावेश होता. तपासादरम्यान, दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील तीन सराईत गुन्हेगारांचा या दरोड्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत सोपान दिनकर बस्ते (३४), राहुल भाऊसाहेब मोरे (३२) आणि संतोष बाबासाहेब गाडे (४२) या तिघांना अटक केली. चौकशीदरम्यान, आरोपींनी चांदोरी त्रिफुली, आडगाव आणि लाखलगाव येथील कृषी औषध दुकानांमध्ये दरोडे टाकल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीवरून तीन वेगवेगळे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी बस्ते आणि मोरे हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर आधीच ११ गुन्हे दाखल आहेत. आरोपी गाडे हा चोरीचा मुद्देमाल विकत घेत असे.
पोलिसांनी आरोपींकडून मारुती स्विफ्ट कार (क्र. एमएच १५ एसजे १६६७), हायड्रॉलिक कटर आणि इतर साहित्य जप्त केले आहे. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.







