पोलिसांची कामगिरी: वर्षभरापासून फरार आरोपी अटकेत
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.११ : नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क-२ ने अथक परिश्रमानंतर दोन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या धाडसी कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या एका आरोपीलाही पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. किरणकुमार चव्हाण, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कार्यरत असून, शहरवासियांच्या सुरक्षेसाठी घरफोडीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
देवळाली गावातील हॉटेल मँगो ट्रीच्या मागील बाजूस एकाच रात्री दोन बंद बंगल्यांची कुलुपे तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरी करण्यात आल्याची घटना २५९/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये उपनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहा. पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सपोउपनि/शंकर काळे, बाळु शेळके, पोहवा/मनोहर शिंदे, प्रकाश महाजन आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेजण तोंड झाकून आणि रेनकोट घालून बंगले फोडताना दिसून आले. सुमारे ९० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर आरोपी हे चुंचाळे शिवार, अंबड येथील म्हाडा बिल्डिंगमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले.
या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती गोळा करत असताना, सपोउपनि/शंकर काळे आणि पोहवा/मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत अंबड एम.आय.डी.सी. येथे दोन संशयित आरोपी काळ्या रंगाच्या टीव्हीएस व्हीक्टर मोटारसायकलवर (क्र. ८५१०) येणार असल्याची माहिती मिळाली. सपोनि/हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/समाधान हिरे, सपोउपनि/शंकर काळे, बाळु शेळके, पोहवा/मनोहर शिंदे, पोअं./महेश खांडबहाले यांच्या पथकाने सापळा रचला. चुंचाळेगाव म्हाडा वसाहत, अंबड येथे दोघांना अटक करण्यात आली.
चौकशी दरम्यान, आरोपींनी (१) अफजल हुसने सैय्यद (वय २९, रा. बलकवडे चाळ, नाशिक) आणि (२) विकास उर्फ विक्की सुधाकर पटेकर (वय ३२, रा. संत कबीरनगर, गंगापुररोड, नाशिक) यांनी २०/०६/२०२५ रोजी रात्री मथुरा रोडवरील बंद बंगल्यांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच २९/०६/२०२५ रोजी आनंदवल्ली, गंगापुररोड येथील एका बंगल्यातून रोख रक्कम चोरी केल्याचेही त्यांनी कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ६४,३७०/- रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि मोटारसायकल जप्त केली आहे.
अफजल हुसैन सैय्यद हा उपनगर पोलीस ठाण्यातील गुरनं. ३२७/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (४), ३ (५) अन्वये नोंदवलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईत गुन्हे शाखा युनिट २ चे सपोनि/हेमंत तोडकर (प्रभारी अधिकारी), सपोनि/डॉ. समाधान हिरे, सपोउपनि/शंकर काळे, बाळु शेळके, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, पोहवा/मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, सुनिल आहेर, चंद्रकांत गवळी, प्रकाश बोडके, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, नितीन फुलमाळी, वाल्मीक चव्हाण, पोअं./तेजस मते, महेश खांडबहाले, संजय पोटींदे, प्रविण वानखेडे, सुनिल खैरनार, जितेंद्र वजीरे यांचाही समावेश होता.







