नाशिक महापालिकेत दिवसाढवळ्या दरोडा! गांधीनगर केंद्रात लिपिकाने हडपले तब्बल २४ लाख रुपये!…..मनपाच्या तिजोरीत ‘पांढरपेशी उंदीर’! करदात्यांच्या २४ लाखांवर डल्ला; लिपिकाचे कारनामे उघड!….!

करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारणारी टोळी सक्रिय? लिपिकासह बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशय; सखोल चौकशीची मागणी..!

लाल 🚨 दिवा -नाशिक,दि.२४:- (विशेष प्रतिनिधी):नाशिककरांनी घाम गाळून भरलेल्या मालमत्ता आणि पाणीपट्टीच्या पैशांवर महापालिकेचेच कर्मचारी डल्ला मारत असल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक पूर्व विभागातील गांधीनगर उपकार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात अवघ्या तीन महिन्यांत तब्बल **२४ लाख २५ हजार ९४० रुपयांचा** महाघोटाळा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लिपिक शशिकांत थोरात याने जाणीवपूर्वक आणि वारंवार हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले असून, यामध्ये बँक कर्मचाऱ्यांचेही हात ओले असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

असा चालत होता पांढरपेशी दरोडा!

सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या वित्तीय वर्षात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागरिक विश्वासाने जो कर रोख स्वरूपात जमा करत होते, ती संपूर्ण रक्कम बँकेत भरण्याऐवजी बँक भरणा स्लिपवर (Deposit Slip) कमी रक्कम नोंदवली जात होती. दि. ३० नोव्हेंबर २०२१ ते १८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत नागरी सुविधा केंद्रात तब्बल ४६ लाख ४५ हजार ९९३ रुपये रोख जमा झाले. मात्र, महापालिकेच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्यात केवळ २२ लाख २० हजार ५३ रुपयेच भरण्यात आले. उरलेले २४ लाख २५ हजार ९४० रुपये लिपिक शशिकांत थोरात याने स्वतःच्या खिशात घातले. पासांचा सारांश आणि बँक स्टेटमेंटची पडताळणी केली असता हा धक्कादायक गोलमाल उघड झाला आहे.

लेखा संहितेला हरताळ

महाराष्ट्र नगरपरिषद लेखा संहिता २०११ च्या नियम ९२ नुसार, स्वीकारलेली रक्कम लागलीच दुसऱ्या दिवशी बँकेत भरणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला केराची टोपली दाखवत रोजच्या रोज हजारो रुपयांची अफरातफर सुरू होती. एकाच दिवसात जमा झालेल्या रक्कमेपैकी लाख-लाख रुपये गायब केल्याचे लेखा विभागाच्या तपासणीत सिद्ध झाले आहे.

आयुक्त साहेब, आता तरी कारवाई करणार का ..?

हा घोटाळा केवळ एका लिपिकाचे काम नसून यात एक मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत माननीय आयुक्तांनी तातडीने खालील पावले उचलावीत अशी संतप्त मागणी नागरिकांमधून होत आहे:

१) चौकशी समिती नेमावी: सन २०१८ ते २०२२ या संपूर्ण कार्यकाळातील सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल तपासणी व्हावी.

२) गुन्हे दाखल करा:केवळ प्रशासकीय कारवाई न करता, अपहार करणारा लिपिक शशिकांत थोरात आणि संशयास्पद बँक कर्मचारी यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हे (FIR) दाखल करावेत.

३) व्याजासह वसुली: जनतेच्या लुटलेल्या २४ लाख रुपयांची व्याजासह संबंधित दोषींकडून वसुली करण्यात यावी.

नाशिक महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या मारलेला हा दरोडा पालिका प्रशासन गांभीर्याने घेणार की दोषींना पाठीशी घालणार, याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!