कायद्याचा बडगा! मिटकेंचा अभ्यासू तपास ठरला नराधमासाठी फास; अल्पवयीन विद्यार्थीनीवरील अत्याचाराचा घेतला वचपा, आरोपीला २० वर्षे कारावास
लाल 🚨 दिवा -अहिल्यानगर:दि.२७:-गुन्हेगार कितीही चलाख असो, पोलिसांची नजर आणि कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच, याचा प्रत्यय पुन्हा एकदा अहिल्यानगरमध्ये आला आहे. गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या ‘त्या’ नराधम शिक्षकाचा बुरखा फाडत, पोलिसांनी त्याला थेट २० वर्षे गजाआड धाडले आहे. या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले आहेत, तत्कालीन डीवायएसपी (नगर शहर) व सध्या नाशिक येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) म्हणून कार्यरत असलेले संदीप मिटके! त्यांच्या कसून केलेल्या आणि बिनचूक तपासामुळेच एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे.
दिनांक १८ ऑगस्ट २०१८… शिक्षणाचे पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या वर्गातच एक राक्षसी कृत्य घडले. विशाल लक्ष्मण बारगळ या शिक्षकाने आपल्या ‘स्पोकन इंग्लिश’च्या क्लासमध्ये येणाऱ्या एका निष्पाप अल्पवयीन विद्यार्थिनीला “तुझे पाठांतर झाले नाही” असे सांगून थांबवून घेतले. इतर विद्यार्थ्यांना घरी पाठवून, एकांतात या नराधमाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. घरी आल्यावर पीडितेने आईला हंबरडा फोडत घडलेली घटना सांगितली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मिटकेंचा ‘मास्टरस्ट्रोक’ आणि नराधमाचा खेळ खल्लास
सुरुवातीला पीएसआय स्वाती देवडकर यांनी तपासाची धुरा सांभाळली, मात्र गुन्ह्याचे गांभीर्य आणि संवेदनशील स्वरूप पाहता, या प्रकरणाचा तपास तत्कालीन डीवायएसपी संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला. एसीपी संदीप मिटके यांनी या प्रकरणाचा अतिशय बारकाईने अभ्यास केला. केवळ गुन्हा दाखल करून ते थांबले नाहीत, तर आरोपीला कायद्याच्या कचाट्यातून निसटता येऊ नये, यासाठी त्यांनी पुराव्यांची अभेद्य साखळी तयार केली.
संदीप मिटके यांनी गोळा केलेले तांत्रिक पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब इतके मजबूत होते की, आरोपीच्या बचावाचे सर्व मार्ग बंद झाले. त्यांना या तपासात पोलीस हवालदार राजू भालसिंग यांनी मोलाची मदत केली. मिटके यांनी न्यायालयात दाखल केलेले दोषारोपपत्र म्हणजे गुन्हेगाराच्या पापाचा कच्चा चिठ्ठाच ठरले.
न्यायालयात खाकीची साक्ष ठरली महत्त्वाची
न्यायालयीन सुनावणीत सरकारी पक्षातर्फे ॲड. अनंत चौधरी यांनी जोरदार युक्तिवाद केला. मात्र, या खटल्याचा कणा ठरली ती तपासी अधिकारी संदीप मिटके यांची साक्ष! सोबतच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिया जगताप आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल यांनी आरोपीचा खोटेपणा उघडा पाडला. कोर्ट पैरवी अधिकारी पीएसआय संजय चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा अडसूळ यांनीही खटल्याच्या पाठपुराव्यात सातत्य ठेवले.
शिक्षा आणि न्याय
अखेर सत्याचा विजय झाला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि संदीप मिटके यांनी सादर केलेले निर्विवाद पुरावे ग्राह्य धरून, विशेष न्यायाधीश डॉ. यू. जे. मोरे यांनी आरोपी विशाल बारगळ याला २० वर्षे सश्रम कारावास
आणि दंडाची शिक्षा सुनावली.
ही शिक्षा म्हणजे केवळ एका गुन्हेगाराला झालेला दंड नाही, तर समाजात विकृत मनोवृत्ती बाळगणाऱ्या नराधमांना पोलिसांनी दिलेला हा कडक इशारा आहे. एसीपी संदीप मिटके यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळेच खाकी वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे, अशी भावना आज जनसामान्यातून व्यक्त होत आहे.







