पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी; परिमंडळ-१ च्या पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत यांच्या नेतृत्वात मोठी कामगिरी.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ३१ (प्रतिनिधी):चोरीला गेलेले आपले दागिने, गाडी आणि मौल्यवान वस्तू परत मिळतील ही आशा सोडून बसलेल्या २८ नागरिकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला. नाशिक शहर पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल २८ लाख १७ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानाने परत केला. आपले स्त्रीधन आणि कष्टाची कमाई परत मिळाल्याने अनेक महिला आणि नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले, तर काहींनी पोलिसांचे आभार मानत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
नाशिक शहरात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याबरोबरच, गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल लवकरात लवकर नागरिकांना परत करण्याचे सक्त आदेश पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिले होते. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत परिमंडळ – १ च्या पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी एक विशेष मोहीम हाती घेतली. त्यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी’ नेमून न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

या धडक मोहिमेअंतर्गत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर आणि मुंबईनाका पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र एक करून गुन्ह्यांचा तपास लावला आणि मुद्देमाल हस्तगत केला. आज, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी एका विशेष कार्यक्रमात हा सर्व ऐवज फिर्यादींना परत करण्यात आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण:
सोन्याचे दागिने: १४१.५१ ग्रॅम
चांदीचे दागिने: १३५ ग्रॅम
मोटारसायकल: १४
चारचाकी वाहने: ०२
मोबाईल फोन: ०७
पितळी डायव्हर्टर: १२ नग
सेंट्रींगच्या लोखंडी प्लेटा: ४८ नग
असा लाखो रुपयांचा मुद्देमाल परत केला. चोरीला गेलेली आपली वाहने परत मिळाल्याने अनेकांचा रोजगाराचा प्रश्न सुटला, तर महिलांना त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याचा अत्यानंद झाला.
यावेळी बोलताना पोलीस उप आयुक्त श्रीमती मोनिका राऊत म्हणाल्या, “पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आमची ही मोहीम यापुढेही प्रत्येक महिन्याला सुरूच राहील. जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करून तो नागरिकांना परत करणे हे आमचे ध्येय आहे.” त्यांनी या यशस्वी कामगिरीबद्दल सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. नाशिक पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.







