थरार… मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग! चार महिन्यांपासून फरार असलेल्या कुख्यात उज्जैनवाल टोळीच्या म्होरक्याच्या उपनगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

गोसावीवाडी परिसरात रचला होता सापळा; गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ३० (वार्ताहर) –फर्नांडिसवाडीत टोळीयुद्धातून अंदाधुंद गोळीबार करून संपूर्ण परिसरात दहशत पसरवणारा आणि गेले चार महिने पोलिसांच्या हातावर तुरी देणारा कुख्यात उज्जैनवाल टोळीचा म्होरक्या राहुल अजय उज्जैनवाल याला अखेर उपनगर पोलिसांनी मध्यरात्रीच्या अंधारात सिनेस्टाईल पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. या थरारक कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी स्वतःच्या नेतृत्वात ही धाडसी कारवाई केल्याने त्यांच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जयभवानीरोड, फर्नांडिसवाडी परिसरात १० जुलैच्या मध्यरात्री दोन गटांतील वर्चस्वाची लढाई आणि हप्तेवसुलीच्या वादातून रक्ताचा सडा पडला होता. लाकडी दांडके आणि धारदार शस्त्रांसह दोन्ही गट एकमेकांना भिडले होते. याचवेळी उज्जैनवाल याने गावठी पिस्तुलातून गोळीबार करून परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र तेव्हापासून मुख्य सूत्रधार राहुल उज्जैनवाल पोलिसांना सातत्याने चकवा देत होता.

मध्यरात्रीची भयाण शांतता… ३० ऑक्टोबरची रात्र… गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना त्यांच्या विश्वासू खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली की, ‘चार महिन्यांपासून फरार असलेला राहुल उज्जैनवाल नाशिकरोडच्या गोसावीवाडी परिसरात येणार आहे’. माहिती मिळताच पोलीस पथक सतर्क झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः या कारवाईचे नेतृत्व स्वीकारले आणि पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व त्यांच्या पथकासह एक धाडसी सापळा रचला.

योजनेनुसार, पोलीस पथकाने गोसावीवाडी परिसराची नाकेबंदी केली. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास राहुल उज्जैनवाल परिसरात शिरताच दबा धरून बसलेल्या पोलिसांना पाहून त्याची पाचावर धारण बसली. पोलिसांची चाहूल लागताच त्याने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. पण उपनगर पोलिसांचे ‘गौरव’ आणि ‘जयंत’ यांनी आपल्या नावाला जागत त्याचा पाठलाग सुरू केला. परिसरातील अरुंद गल्लीबोळातून जीवघेणा पाठलाग केल्यानंतर अखेर पोलीस अंमलदार गौरव गवळी आणि जयंत शिंदे यांनी अत्यंत शिताफीने झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या.

**पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त**

त्याची अंगझडती घेतली असता, पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या कंबरेला ५०,००० रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि मॅगझिनमध्ये पाच जिवंत काडतुसे सापडली. ५५,००० रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हेच पिस्तूल फर्नांडिसवाडी गोळीबार प्रकरणात वापरल्याची कबुली त्याने दिली आहे.

गुन्हेगारीची लांबलचक कुंडली

राहुल उज्जैनवाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर उपनगर, नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याची ही गुन्हेगारी कुंडली पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

पथकाचे सर्वत्र कौतुक

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका सशस्त्र आणि धोकादायक गुन्हेगाराला पकडल्याबद्दल पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किशोर काळे आणि सहा. आयुक्त श्रीमती संगीता निकम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!