लाल दिव्याचा स्फोटक इम्पॅक्ट !
कामगार उपायुक्तांच्या कारवाईनंतर ‘सुविक अॅस्पायर’वर प्रशासनाचा हातोडा; सुमित चौधरीच्या बेनामी साम्राज्याचा शोध सुरू!*
आलिशान गाड्या आणि पुणे-नाशिकमधील भूखंड पुढील लक्ष्य? पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३०:-विशेष प्रतिनिधी |शहरातील गर्भश्रीमंत वस्तीत, इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅकजवळ बेकायदेशीरपणे डोकं वर काढणाऱ्या ‘सुविक अॅस्पायर’ या टॉवरवर अखेर प्रशासकीय यंत्रणेने जोरदार प्रहार केला आहे. कामगार उपायुक्तांनी केलेल्या धडक कारवाईनंतर बिल्डर सुमित चौधरीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ‘लाल दिवा’ने या भ्रष्टाचाराच्या इमल्यावर प्रकाशझोत टाकताच, मंत्रालयापासून महापालिकेपर्यंत यंत्रणा खडबडून जागी झाली असून, चौधरीच्या कोट्यवधींच्या बेनामी साम्राज्याच्या मुळावरच घाव घालण्याची तयारी सुरू झाल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘लाल दिवा’ची तोफ धडाडली… आणि चौधरीच्या गोटात शांतता पसरली!
गेले अनेक महिने सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणाऱ्या बिल्डर सुमित चौधरीचा माज ‘लाल दिवा’च्या एकाच बातमीने उतरवला आहे. कामगार कायद्याचा भंग, कामगारांच्या जिवाशी खेळ आणि सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण या सर्व प्रकरणांची स्फोटक माहिती ‘लाल दिवा’ने थेट कामगार मंत्र्यांच्या दरबारात पोहोचवली. त्यानंतर सूत्रे इतक्या वेगाने फिरली की, चौधरीच्या गोटात स्मशानशांतता पसरली आहे. कामगार उपायुक्तांनी थेट साईटवर धडक मारून कारवाईचा नारळ फोडला आणि बेकायदेशीर बांधकामाचा पहिला बुरुज ढासळला.
“हा रस्ता माझ्या बापाचा!” बिल्डरचा अहंकार नडला, आता मोजणार दंड!*
“हा रस्ता आमच्या प्रोजेक्टचाच भाग आहे,” अशी दर्पोक्ती करत इंदिरानगरमधील सार्वजनिक रस्ता अडवून वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या चौधरीचा हाच अहंकार आता त्याला नडला आहे. महापालिकेच्या नगररचना विभागाने या प्रकरणी स्वतंत्र चौकशी सुरू केली असून, रस्ता अडवल्याबद्दल मोठा दंड आकारण्यासोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. लोखंडी सळ्या, सिमेंट आणि धुळीच्या साम्राज्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी ‘लाल दिवा’चे आभार मानले आहेत.
बाप कार्यकारी अभियंता, मुलगा ‘उद्योगपती’! संपत्तीच्या ‘टॉवर’ची चौकशी होणार?
अवघ्या बत्तीस वर्षांच्या सुमित चौधरीने उभारलेले कोट्यवधींचे साम्राज्य आता तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहे. त्याचे वडील, जे स्वतः कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत, त्यांच्या कार्यकाळातील व्यवहारांचीही आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. ‘लाल दिवा’च्या हाती लागलेल्या माहितीनुसार, चौधरी पिता-पुत्रांच्या नावे नाशिक आणि पुणे येथे अनेक भूखंड, व्यावसायिक मालमत्ता आणि अज्ञात ठिकाणी मोठी गुंतवणूक असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाची व्याप्ती पाहता, लवकरच अंमलबजावणी संचालनालय (ED) किंवा आयकर विभागाची एन्ट्री होऊ शकते, असा अंदाज कायदेतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
जीवाशी खेळ! कामगारांच्या सुरक्षेला हरताळ!
‘सुविक अॅस्पायर’च्या साईटवर कामगारांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा उपकरणे पुरवली जात नव्हती. ना हेल्मेट, ना सेफ्टी बेल्ट, ना संरक्षक जाळी! पैशाच्या हव्यासापोटी कामगारांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून, याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते विचारत आहेत.
नागरिकांचा आक्रोश! “कारवाई नाही, तर थेट टाळे ठोकू!”
“प्रशासनाने आता केवळ तात्पुरती कारवाई करून चालणार नाही. जोपर्यंत हा बेकायदेशीर टॉवर जमीनदोस्त होत नाही आणि सार्वजनिक रस्ता मोकळा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा संतप्त इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. “पुढच्या वेळी आम्ही थेट बांधकामाला टाळे ठोकू,” असेही नागरिक म्हणाले. या प्रकरणामुळे आता संपूर्ण नाशिकमधील बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले आहेत.







