नाशिक पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये! सातपूर गोळीबार प्रकरणानंतर आयुक्त कर्णिकांचा पी. एल. गँगला दणका; म्होरक्या प्रकाश लोंढेसह संपूर्ण टोळीवर मोक्का!

आता शहरात दादागिरी चालणार नाही! पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांचा कठोर पवित्रा, कुख्यात प्रकाश ‘बॉस’ लोंढेची टोळी मोक्का कायद्याने जेरबंद!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८ (विशेष प्रतिनिधी):सातपूर परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि नुकत्याच झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या कुख्यात ‘पी. एल. गँग’च्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीची वाढती गुन्हेगारी आणि संघटित दहशतीची गंभीर दखल घेत, नाशिक शहर पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक यांनी टोळीचा म्होरक्या प्रकाश मोगल लोंढे उर्फ ‘बॉस’ आणि त्याच्या संपूर्ण टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे नाशिकच्या गुन्हेगारी विश्वात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२५ अन्वये दाखल असलेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात ‘पी. एल. गँग’चा सहभाग निष्पन्न झाला होता. तपासात असे समोर आले की, टोळीप्रमुख प्रकाश ‘बॉस’ लोंढे आणि त्याचे साथीदार संघटितपणे परिसरात दहशत निर्माण करत होते. अवैध शस्त्रांचा धाक दाखवून हिंसाचार करणे, आर्थिक फायद्यासाठी व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करणे आणि खंडणी वसूल करून परिसरात आपले वर्चस्व निर्माण करणे, असे गंभीर गुन्हे या टोळीने पूर्वनियोजित कट रचून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य आणि टोळीची संघटित दहशत पाहता, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर पाऊल उचलत या गुन्ह्यात मोक्का कायद्याच्या कलम ३(१) (ए), ३(२) आणि ३(४) चा समावेश करण्याचे आदेश दिले. मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याने आरोपींच्या मुसक्या आवळल्या गेल्या असून, त्यांना जामीन मिळणेही आता कठीण होणार आहे. या महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास अंबड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

गुन्हेगारांनो, आता खैर नाही!

या कारवाईच्या माध्यमातून पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरातील तमाम गुन्हेगारी टोळ्यांना सज्जड इशारा दिला आहे. जे गुन्हेगार आपल्या गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त होणार नाहीत, त्यांच्यावर मोक्का, एम.पी.डी.ए. यांसारख्या कठोर कायद्यान्वये कारवाई केली जाईल आणि शहराची शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!