स्वतःला आरपीआय कार्यकर्ता भासवून मंत्रालयात ओळखीचे नाटक; मुंबईत बनावट मेडिकल, घाटकोपरमध्ये बनावट ट्रेनिंगही!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १६ (विशेष प्रतिनिधी):रेल्वेमध्ये सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून, चक्क भारत सरकारची राजमुद्रा, रेल्वेचा लोगो आणि स्कॅन होणारा QR कोड असलेले बनावट नियुक्तीपत्र (Offer Letter) देऊन एकाच कुटुंबातील तिघांना तब्बल १९ लाख ५० हजार रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात उघडकीस आला आहे. या हाय-टेक फसवणूक प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संतोष चंद्रकांत कटारे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील फिर्यादी महेंद्र गोरख सोनवणे (वय २४, रा. जेलरोड) या एमबीए झालेल्या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, या रॅकेटचा सूत्रधार संतोष कटारे याने स्वतःला आरपीआयचा कार्यकर्ता असल्याचे आणि थेट मंत्रालयापर्यंत ओळख असल्याचे भासवून फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांना आपल्या जाळ्यात ओढले. विशेष म्हणजे, या टोळीने केवळ पैसे उकळले नाहीत, तर पीडितांचा विश्वास जिंकण्यासाठी मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये बनावट वैद्यकीय तपासणी आणि घाटकोपर, नाहूर रेल्वे स्टेशनवर बनावट ट्रेनिंग देण्यापर्यंत मजल मारली.
ही घटना जुलै २०२२ मध्ये सुरू झाली. महेंद्र सोनवणे, त्यांचे वडील आणि चुलत बहीण रेल्वे स्टेशनवर नोकरीविषयी चर्चा करत असताना संतोष कटारे याने त्यांची चर्चा ऐकली. त्याने स्वतःहून ओळख करून देत रेल्वेमध्ये अनेकांना नोकरी लावल्याचे सांगितले. विश्वास बसावा यासाठी त्याने बनावट नियुक्तीपत्रे दाखवली, ज्यावर राजमुद्रा, रेल्वेचा लोगो आणि स्कॅन केल्यावर माहिती दिसणारा QR कोडही होता. हा हाय-टेक बनाव पाहून सोनवणे कुटुंबीयांचा त्याच्यावर विश्वास बसला.
कटारेने रेल्वेच्या ‘ग्रुप सी’ पदासाठी प्रत्येकी ७ लाख रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार, महेंद्र सोनवणे यांच्या वडिलांनी १९ जुलै २०२२ रोजी ५.३५ लाख रुपयांचा चेक आणि १.६५ लाख रुपये रोख, असे एकूण ७ लाख रुपये कटारेला दिले. पैसे दिल्यानंतर कटारेने महेंद्रला मुंबईत त्याचा साथीदार संतोष गायकवाड याच्याकडे पाठवले. गायकवाडने महेंद्रला सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये नेऊन रक्ताचे नमुने घेऊन बनावट वैद्यकीय तपासणीचा देखावा केला आणि नंतर रेल्वेच्या मुख्य कार्यालयाबाहेर बनावट शिक्के आणि सही असलेले नियुक्तीपत्र दिले. या पत्राच्या आधारे महेंद्रने घाटकोपर स्टेशनवर दोन महिने चक्क अनाउन्समेंटची बनावट ट्रेनिंगही घेतली.
हा प्रकार यशस्वी झाल्याने सोनवणे कुटुंबीयांनी त्यांची चुलत बहीण संगिता सोनवणे आणि मामा चेतन वानखेडे यांच्या नोकरीसाठीही कटारेला पैसे दिले. संगितासाठी ७ लाख रुपये, तर मामाच्या ‘ग्रुप डी’ पदासाठी ५.५० लाख रुपये दिले. त्यांनाही अशाच प्रकारे बनावट नियुक्तीपत्रे देऊन नाहूर स्टेशनवर ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आले.
जेव्हा महेंद्र नाहूर स्टेशनवर तिकीट काउंटरवर ट्रेनिंगसाठी गेला, तेव्हा तेथील एका खऱ्या अधिकाऱ्याने त्याला चौकशीसाठी बोलावले. “तुम्हाला कोणी पाठवले?” या प्रश्नावर महेंद्रने “विनोद मंडल सरांनी” असे उत्तर दिले. त्यावर त्या अधिकाऱ्याने “या नावाचा कोणीही व्यक्ती रेल्वेत नाही,” असे सांगताच महेंद्रच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने घरी येऊन हा प्रकार सांगितल्यावर संगिता आणि चेतन यांचीही फसवणूक झाल्याचे उघड झाले.
आरोपी फरार, पैसेदेण्यास टाळाटाळ:
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोनवणे कुटुंबीयांनी संतोष कटारे याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने फोन उचलणे बंद केले आणि नंबर ब्लॉक केला. त्याचे देवळाळी कॅम्प येथील कार्यालयही बंद आढळले. पीडितांनी एका माजी नगरसेवकामार्फत मध्यस्थीचा प्रयत्न केला असता, कटारेने पैसे परत करण्याचे लेखी आश्वासन दिले, पण आजपर्यंत एकही पैसा परत केलेला नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने महेंद्र सोनवणे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी संतोष चंद्रकांत कटारे, संतोष शिवराम गायकवाड आणि अमोल ठाकुर (ज्याच्या खात्यावर पैसे जमा केले) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि संगनमत करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. या हाय-टेक रॅकेटमागे आणखी कोण आहे आणि त्यांनी अजून किती जणांना अशा प्रकारे गंडवले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.







