बोगस कागदपत्रांचा खेळ, काम होण्याआधीच कंत्राटदाराला कोट्यवधींचे दान; शहरात प्रचंड खळबळ!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१६:-(विशेष प्रतिनिधी):रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या आरोग्य यंत्रणेलाच भ्रष्टाचाराची कीड लागल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. जिल्हा रुग्णालयातील मॉड्युलर आयसीयूच्या कामात तब्बल ३ कोटी ३७ लाख रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे समोर आले असून, या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) डॉ. अशोक थोरात यांच्यासह उच्चपदस्थ अधिकारी आणि कंत्राटदार अशा एकूण आठ जणांवर सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने नाशिकच्या वैद्यकीय वर्तुळात अक्षरशः भूकंप झाला आहे.
जागरूक नागरिक संदीप बाळकृष्ण मेटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हा संपूर्ण घोटाळा म्हणजे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील भ्रष्ट साखळीचा उत्तम नमुना आहे. फेब्रुवारी २०२२ ते जुलै २०२५ या काळात आरोपींनी संगनमताने शासकीय तिजोरीवर दरोडा टाकला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्याची पटकथा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लिहिण्यात आली होती.
1. बोगस कंपनी, बनावट कागदपत्रे: दंतयांत्रिकी सागर चोथवे, त्याची पत्नी अश्विनी आणि वडील दिलीप चोथवे यांच्या ‘क्रेननोवेटिव्ह पॉवरटेक प्रा. लि.’ या कंपनीला नाशिक आणि मालेगाव रुग्णालयातील आयसीयूचे कंत्राट मिळवून देण्यासाठी हा कट रचण्यात आला. या कंपनीने औषध परवाना, वार्षिक उलाढाल आणि अनुभवाचे प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे बनावट तयार केली.
2. अधिकाऱ्यांचीच साथ: धक्कादायक म्हणजे, निविदा पडताळणी समितीमध्ये असलेले डॉ. अशोक थोरात, डॉ. निखिल सौंदाणे आणि डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांनी या बनावट कागदपत्रांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला. कोणतीही पडताळणी न करता त्यांनी ही निविदा मंजूर होण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.
3. नियम धाब्यावर: औषध निर्माण अधिकारी शिरीष माळी यांनी तर कहरच केला. निविदेला अधिकृत मान्यता मिळण्यापूर्वीच त्यांनी ती प्रसिद्ध केली आणि काम पूर्ण होण्याआधीच देयके (बिल) तयार करून ठेवली.
4. कामाआधीच दाम: कामाचे कोणतेही तांत्रिक मूल्यांकन झाले नाही, काम पूर्ण झाल्याचा दाखला नाही, तरीही जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हडपे आणि तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी कंपनीला ५० टक्के रक्कम, म्हणजेच तीन कोटी सदतीस लाख रुपये देण्याची शिफारस केली आणि ती रक्कम अदाही करण्यात आली

सरकार वाडा पोलिसांनी या सर्वांविरुद्ध फसवणूक, कट रचणे आणि शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा (गु. र. नं. 310/2025) दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आरोग्य विभागातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलीस तपासात आणखी कोणते गौप्यस्फोट होतात याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.







