“साहेब, साखर-चहापत्ती नाही, गांजा घ्या!”सौंदाणेत किराणा दुकानावरील छाप्यात धक्कादायक प्रकार उघड; ९ किलो गांजासह मालक अटकेत!

लाल 🚨 दिवा-सौंदाणे (ता. मालेगाव), दि. १५ : नेहमीच्या गरजेच्या वस्तू, डाळ-तांदूळ आणि किराणा सामानाच्या नावाखाली चक्क गांजाचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातील सौंदाणे शिवारात उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका किराणा दुकानावर धाड टाकून तब्बल ९ किलो गांजासह एका इसमाच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांची धडक कारवाई, ‘शेरा’ने केला पर्दाफाश!

नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना सौंदाणे शिवारातील इंदिरानगर येथील ‘श्रीगणेशा किराणा’ दुकानातून गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून श्री. मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचा श्वान ‘शेरा’ याला सोबत घेऊन सापळा रचला.

मंगळवारी दुपारी पोलिसांनी दुकानावर छापा टाकताच मालक निलेश बापू पवार (वय ३०) याची भंबेरी उडाली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र ‘शेरा’ नावाच्या श्वानाने दुकानातील एका गुप्त कप्प्याकडे पाहून भुंकायला सुरुवात करताच निलेशचा चेहरा पांढराफटक पडला. पोलिसांनी त्या ठिकाणी तपासणी केली असता, तब्बल १,७८,४०० रुपये किमतीचा ०८ किलो ९२० ग्रॅम गांजा, विक्रीतून आलेली १०,००० रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि गांजा ओढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ५० चिलीम असा एकूण २,००,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

किराणा दुकानाच्या आडून तरुणाईला नशेच्या गर्तेत

निलेश पवार हा गेल्या अनेक महिन्यांपासून किराणा दुकानाचा केवळ दिखावा करून गांजा विक्रीचा गोरखधंदा चालवत होता. परिसरातील तरुणाई आणि व्यसनी लोकांना तो छुप्या पद्धतीने गांजा पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

निलेश पवार याच्या विरोधात मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि मालेगाव तालुका पोलिसांच्या पथकाने कौतुकास्पद कामगिरी केली. यापुढेही अंमली पदार्थ विक्रेत्यांवर अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!