फेसबुकवरील मैत्री पडली २.७८ कोटींना; सायबर पोलिसांच्या महाकारवाईत फिर्यादीला १० लाख परत, २० लाखांची रक्कम गोठवली!
नाशिक ते कोझिकोड (केरळ) हजारो किलोमीटरचा पाठलाग, तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर लावला यशस्वी सापळा.
पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने सायबर पथकाची चमकदार कामगिरी.
लाल 🚨 दिवा-नाशिक,१६:-सोशल मीडियावर अनोळखी महिलेशी मैत्री करणे किती महागात पडू शकते, याचा प्रत्यय देणाऱ्या एका मोठ्या सायबर फसवणुकीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ७८ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या दोन म्होरक्यांना नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी थेट केरळच्या कोझिकोडमधून बेड्या ठोकल्या आहेत. या धाडसी कारवाईत पोलिसांनी फिर्यादीला तब्बल १० लाख रुपये परत मिळवून दिले असून, २० लाख ४४ हजार रुपयांची रक्कम विविध बँक खात्यांमध्ये गोठवली आहे.
या प्रकरणातील फिर्यादीला काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर एका अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. सुरुवातीला गोड बोलून आणि मैत्रीचे नाटक करून या महिलेने फिर्यादीचा पूर्ण विश्वास संपादन केला. त्यानंतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत करोडपती होण्याचे स्वप्न दाखवले. या भूलथापांना बळी पडून फिर्यादीने वेळोवेळी तब्बल २,७८,५०,०००/- रुपये या सायबर भामट्यांच्या बँक खात्यात गुंतवले. काही दिवसांनी परतावा मिळणे तर दूरच, उलट समोरील व्यक्तीने संपर्क तोडल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
फिर्यादीने २२ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशन गाठून आपली कैफियत मांडली. गुन्ह्याचे गांभीर्य आणि रक्कम मोठी असल्याने पोलीस अधीक्षक मा. बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. अपर पोलीस अधीक्षक मा. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, प्रमोद जाधव, तुषार खालकर, राहुल भोर आणि सोहेल मुलानी यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे जाळे विणले. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे गेले होते, त्या खात्यांचा आणि मोबाईल नंबरचा माग काढत पोलीस थेट केरळच्या कोझिकोड शहरात पोहोचले.
हजारो किलोमीटर दूर, अनोळखी भाषा आणि प्रदेशात नाशिक ग्रामीण पोलिसांनी अत्यंत हुशारीने सापळा रचला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी १) सजा हनुन आणि २) अब्दुल बासिथ थंगल (दोघेही रा. कोझिकोड, केरळ) यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या अटकेनंतर या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
या कारवाईत पोलिसांनी केवळ आरोपींनाच अटक केली नाही, तर फिर्यादीला तात्काळ दिलासाही दिला. फसवणूक झालेल्या रकमेपैकी १०,००,०००/- रुपये फिर्यादीला परत मिळवून देण्यात आले आहेत. याशिवाय, सायबर भामट्यांच्या विविध बँक खात्यांमधील २०,४४,०००/- रुपयांची रक्कम गोठवण्यात आली असून, ती रक्कमही न्यायालयाच्या आदेशाने लवकरच फिर्यादीला परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या चमकदार कामगिरीमध्ये तांत्रिक विश्लेषण विभागाचे हेमंत गिलिबिले आणि प्रदीप बहिरम यांचेही मोलाचे योगदान ठरले. या टोळीचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पसरले आहेत, याचा पोलीस कसून तपास करत आहेत
- पोलिसांचे ‘सायबर’ सुरक्षा कवच!
नाशिक ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना आवाहन
नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून खालील गोष्टी टाळाव्यात:
अनोळखी फोन कॉल्स किंवा सोशल मीडियावरील व्यक्तींना आपल्या बँक खात्याची गोपनीय माहिती (पासवर्ड, ओटीपी, सीव्हीव्ही) देऊ नये.
कोणतीही बँक फोनवर अशी माहिती विचारत नाही. संशय आल्यास थेट बँकेच्या शाखेत संपर्क साधा.
अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळा. यामुळे तुमचा मोबाईल किंवा संगणक हॅक होऊ शकतो.
कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्यास वेळ न घालवता तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३०/१९४५ वर संपर्क साधा.
तसेच, नाशिक ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनच्या ०२५३-२२००४०८ किंवा
७६६६३१२११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.







