खुल्लमखुल्ला दादागिरी! सार्वजनिक रस्ता गिळंकृत, कामगारांचा जीव वाऱ्यावर; प्रशासन झोपेत ! पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि कामगार उपायुक्त, ही मनमानी थांबवणार कोण ?

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१५:- विशेष प्रतिनिधी :शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ, हॉटेल सयाजीच्या मागे सुरू असलेल्या ‘सुविक अ‍ॅस्पायर’ या टॉवरने अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे. बिल्डर सुमित चौधरी याच्या मनमानी आणि मुजोर कारभारामुळे स्थानिक नागरिक आणि कामगारांचा जीव धोक्यात आला असून, परिसरातील संतापाचा अक्षरशः स्फोट झाला आहे. सार्वजनिक रस्ता अडवून, वाहतुकीचा गळा घोटून आणि कामगारांच्या सुरक्षेला हरताळ फासून हा बांधकाम व्यावसायिक कायद्याला आव्हान देत आहे, तरीही प्रशासन मूग गिळून गप्प का, असा जळजळीत सवाल नाशिककर विचारत आहेत.

रस्ता आमचा, पण मालकी बिल्डरची!

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या बांधकामाच्या ठिकाणी आता स्लॅब काढण्याच्या नावाखाली बिल्डरने संपूर्ण रस्ताच गिळंकृत केला आहे. कोणतीही परवानगी न घेता रस्त्यावर सिमेंट मिक्सर, लोखंडी सळ्यांचा ढिगारा आणि अवजड वाहने उभी केली आहेत. यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे, तर पादचाऱ्यांना मृत्यूच्या सावटाखाली चालावे लागत आहे.

“हे काय मोगलाई आहे का? स्वतःच्या फायद्यासाठी लोकांचा रस्ता बंद करायचा, हा अधिकार याला दिला कोणी?” अशी उद्विग्न प्रतिक्रिया एका स्थानिक महिलेने दिली.

गरिबांच्या जिवाशी खेळ, बिल्डर मात्र मालामाल!

या बांधकामाच्या ठिकाणी कामगार कायद्याची उघडपणे पायमल्ली होत आहे. शेकडो फूट उंचीवर काम करणाऱ्या मजुरांच्या डोक्यावर ना हेल्मेट, कमरेला ना सेफ्टी बेल्ट, आणि इमारतीला ना कोणती संरक्षक जाळी! अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देणारा हा प्रकार रोज सुरू आहे. उद्या एखादा कामगार खाली कोसळला किंवा बांधकामाचे साहित्य एखाद्या नागरिकाच्या डोक्यात पडले, तर या पापाचा धनी कोण होणार? कामगार उपायुक्तांचे कार्यालय केवळ कागदी घोडे नाचवत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाचा वरदहस्त की आर्थिक लागेबांधे?

स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र प्रत्येक वेळी त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. बिल्डरच्या आर्थिक वजनाखाली प्रशासन दबले आहे का, अशी चर्चा परिसरात उघडपणे सुरू आहे. परवानगीच्या अटी व शर्ती धाब्यावर बसवून सुरू असलेला हा खेळ थांबवला नाही, तर मोठी दुर्घटना अटळ आहे. प्रशासनाने आतातरी डोळे उघडून या मुजोर बिल्डरच्या मुसक्या आवळाव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

  • जावब द्या, साहेब!

*सार्वजनिक मालमत्ता असलेल्या रस्त्यावर खासगी कब्जा करण्याची हिंमत बिल्डरमध्ये आली कोठून?

 कामगारांना मृत्यूच्या दाढेत ढकलणाऱ्या सुमित चौधरीवर मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा कधी दाखल होणार?

 तक्रारी करूनही डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेल्या अधिकाऱ्यांची बिल्डरशी हातमिळवणी आहे का?

 आता एखादा बळी गेल्यावरच तुम्हाला जाग येणार आहे का?

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!