‘भाईगिरी’ पडली महागात! ज्या ठिकाणी केला हल्ला, त्याच ठिकाणी पोलिसांनी शिकवला कायद्याचा धडा; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १५ (विशेष प्रतिनिधी):सोशल मीडियावर भरदिवसा केलेल्या खुनी हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल करून नाशिककरांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगार चेतन उर्फ ‘किऱ्या’ परदेशीला नाशिक शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक तर केलीच, पण त्यानंतर जो काही ‘कायद्याचा हिसका’ दाखवला, त्याने संपूर्ण शहरातील गुन्हेगारी विश्वाला हादरा बसला आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘कर्णिक पॅटर्न’ची नाशिकमध्ये पहिल्यांदाच अंमलबजावणी करत, गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने आरोपी ‘किऱ्या’ची गुन्ह्याच्या ठिकाणीच, म्हणजेच पंचवटीतील नागचौकात हजारो नागरिकांसमोर धिंड काढली. ज्या ठिकाणी त्याने ‘भाईगिरी’ दाखवली होती, त्याच ठिकाणी त्याची सगळी मस्ती उतरवून पोलिसांनी गुन्हेगारांना सणसणीत इशारा दिला आहे
दिनांक १३ ऑक्टोबर रोजी नागचौक परिसरात आरोपी चेतन उर्फ किऱ्या परदेशी आणि त्याच्या साथीदाराने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला होता. रस्त्यात आरडाओरड करत दहशत पसरवून पीडिताच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केले होते. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले होते. यावर तात्काळ कारवाई करत गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी ‘किऱ्या’ला भद्रकाली परिसरातून शिताफीने अटक केली.
आणि नाशिकने पाहिला ‘कर्णिक पॅटर्न’!
अटक झाल्यानंतर खरी कारवाई सुरू झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने आरोपी ‘किऱ्या’ला थेट गुन्ह्याच्या ठिकाणी, नागचौकात आणले. पोलिसांचा ताफा आणि आरोपीला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. ज्या ठिकाणी त्याने दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याची वरात काढली. “येथेच हल्ला केला होतास का?”, “अशीच भाईगिरी करत होतास का?” असे प्रश्न विचारत पोलिसांनी त्याची चांगलीच हजेरी घेतली. कालपर्यंत ज्याच्या नावाने लोक घाबरत होते, तोच ‘किऱ्या’ आज पोलिसांसमोर मान खाली घालून उभा होता. हे दृश्य पाहून नागरिकांच्या चेहऱ्यावरची भीती नाहीशी झाली आणि त्यांनी पोलिसांच्या धाडसाला टाळ्या वाजवून दाद दिली.
या ‘कर्णिक पॅटर्न’मुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला वचक पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. ही केवळ एका गुन्हेगारावरील कारवाई नसून, शहरात दहशत माजवू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी एक कठोर संदेश आहे. या कारवाईमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, गुन्हेगारीमुक्त नाशिकच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक पोलीस उप आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त मा.श्री. संदिप मिटके
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली नेतृत्व: वपोनि. डॉ. अंचल मुदगल (गुन्हेशाखा युनिट १)अधिकारी व अंमलदार:पोउनि. सुदाम सांगळे, पोहवा. वाघमारे, देवरे, विशाल काटे, मरकड, परदेशी, नाझीम पठाण, मुख्तार शेख, संदीप भांड.







