नाशिक की गुन्हेगारी जानलेवा’ म्हणणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांचा सज्जड दम.
सोशल मीडियावरील ‘हिरो’ रस्त्यावर आले ‘झिरो’; नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव.
कायदा हातात घेणाऱ्यांची गय नाही, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा थेट इशारा.
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१४:- (विशेष प्रतिनिधी):सोशल मीडियावर शस्त्रे दाखवून आणि धमक्यांचे संवाद टाकून दहशत माजवणाऱ्या टवाळखोरांना नाशिक पोलिसांनी ‘कर्णिक पॅटर्न’चा असा काही दणका दिला आहे की, ‘रील लाईफ’मधील त्यांची ‘भाईगिरी’ ‘रिअल लाईफ’मध्ये अवघ्या काही तासांतच धुळीस मिळाली. ‘नाशिक की गुन्हेगारी जानलेवा है रे, सरळ घरात घुसून…’ अशा फिल्मी संवादांचे रिल्स बनवून परिसरात आपली दहशत निर्माण करू पाहणाऱ्या पाच तरुणांना उपनगर पोलिसांनी बेड्या तर ठोकल्याच, पण ज्या रस्त्यांवर ते आपली हवा करू पाहत होते, त्याच रस्त्यावरून त्यांची वरात काढून कायद्याचा धाक काय असतो, हे दाखवून दिले
.
जेलरोड परिसरातील कॅनल रोड, आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणारे सोहेल पठाण, गौरव भामरे, आदित्य अहिरे, किशोर चव्हाण आणि विनोद घुगे या पाच जणांनी सोशल मीडियावर एक रील व्हायरल केले. यात ते हातात घातक वस्तू घेऊन ‘नाशिक की गुन्हेगारी जानलेवा है’ अशा धमक्या देत होते. या रीलच्या माध्यमातून परिसरातील नागरिक आणि तरुणांमध्ये भीतीचे वातावरण पसरवून स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा त्यांचा डाव होता. हा प्रकार नाशिक पोलिसांच्या नजरेत येताच, पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारीविरोधात ‘झीरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारल्याने, या प्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने सापळा रचून या पाचही संशयितांना अटक केली. केवळ अटक करून न थांबता, पोलिसांनी या ‘सोशल मीडिया गँगस्टर्स’ना चांगलाच धडा शिकवला.
ज्या परिसरात दहशत माजवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्याच जेलरोड आणि मुक्तिधाम परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली. कालपर्यंत छाती काढून फिरणारे हे तरुण, पोलिसांच्या गराड्यात मान खाली घालून चालत होते. पोलिसांनी दाखवलेल्या या ‘खडतर’ वाटेमुळे त्यांची काही तासांपूर्वीची सर्व मस्ती उतरली होती.
कर्णिक पॅटर्न’ने गुन्हेगारांचे धाबे दणाणले
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारी मोडून काढण्याचा जो निर्धार केला आहे, त्याचीच ही झलक असल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगाराच्या मनात कायद्याचा धाक निर्माण करणे, ज्या ठिकाणी गुन्हा किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला, त्याच ठिकाणी जनतेसमोर त्यांची ‘हवा’ काढणे, हेच ‘कर्णिक पॅटर्न’चे वैशिष्ट्य आहे. या कारवाईमुळे केवळ या पाच जणांनाच नव्हे, तर सोशल मीडियाचा वापर करून समाजात भीती पसरवणाऱ्या आणि तरुणाईची दिशाभूल करणाऱ्या प्रत्येकाला एक सज्जड इशारा मिळाला आहे. उपनगर पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांमधून जोरदार स्वागत होत असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना वेळीच ठेचणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.







