सिडकोतील बेकायदेशीर मालमत्तेवर पोलिसांचा हातोडा; गुन्हेगारी साम्राज्याला सुरुंग!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१२:- (विशेष प्रतिनिधी):
‘औरा’ बार गोळीबार प्रकरणी नगरसेवक प्रकाश लोंढे आणि मुलगा भूषण यांच्या अटकेने शहरात खळबळ उडालेली असतानाच, नाशिक पोलिसांनी आता या गॅंगच्या आर्थिक साम्राज्यालाही सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. नाशिक अंबड पोलीस ॲक्शन मोडवर येत, सिडको परिसरातील लोंढे गॅंगने बळकावलेला एक आलिशान बंगला सील केला आहे. पोलिसांच्या या दुहेरी कारवाईने गुन्हेगारी विश्वात अक्षरशः सन्नाटा पसरला आहे.
‘दहशतीचे केंद्र’ पोलिसांकडून जमीनदोस्त!
सिडकोतील उत्तम नगर परिसरात हा बंगला होता. अनेक वर्षांपासून या बंगल्यावर लोंढे गॅंगने बेकायदेशीरपणे कब्जा केला होता आणि तो दहशतीचे केंद्र बनला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अंबड पोलिसांनी आज धडक कारवाई करत नागरिकांच्या उपस्थितीत हा बंगला सील केला, ज्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अटक, दिंड आणि आता मालमत्तेवर प्रहार!
ही कारवाई लोंढे पिता-पुत्रांच्या अटकेचाच पुढचा भाग आहे. काही दिवसांपूर्वी ‘औरा’ बारमधील खंडणी आणि गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने त्यांना अटक केली होती. त्यानंतर, ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला आहे,’ अशा घोषणा देत पोलिसांनी त्यांची भररस्त्यातून दिंड काढली होती. या संपूर्ण टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई अटळ मानली जात असतानाच, आता त्यांच्या मालमत्तेवरही कारवाई सुरू झाल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
“केवळ आरोपींना अटक करून आम्ही थांबणार नाही. त्यांनी गुन्हेगारीतून बळकवलेली सर्व संपत्ती कायद्याच्या कक्षेत आणली जाईल. संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे हेच आमचे ध्येय आहे.”
– वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक, जग्वंदर सिंग राजपूत अंबड पोलीस स्टेशन
अटक, दिंड आणि आता मालमत्ता जप्ती, या तिहेरी कारवाईने नाशिक पोलिसांनी गुन्हेगारांना स्पष्ट संदेश दिला आहे की, ‘आता तुमची खैर नाही’. या कारवाईमुळे लोंढे गॅंगचे कंबरडे मोडले असून, शहरात कायद्याचे राज्य पुन्हा प्रस्थापित होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.







