अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीला थेट ‘दणका’; अधिकाऱ्यांना दिले कडक अल्टीमेटम
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२:-नाशिक शहराची वाहतूक व्यवस्था आता ‘स्मार्ट’ होणार याचे संकेत मिळाले आहेत! पोलीस उपायुक्त (वाहतूक) पदाचा कार्यभार स्वीकारताच दुसऱ्याच दिवशी श्रीमती किरिथिका सी.एम. यांनी थेट रस्त्यावर उतरून शहरातील वाहतुकीचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या आदेशानुसार, नाशिककरांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालक आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
कालच पदभार स्वीकारलेल्या श्रीमती किरिथिका यांनी आज सकाळीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शहरातील वाहतुकीची रणभूमी अक्षरशः पिंजून काढली. सहा. पोलीस आयुक्त श्री. सुधाकर सुरडकर आणि प्रभारी अधिकारी श्री. युवराज पतकि यांना सोबत घेऊन त्यांनी अशोकस्तंभ, रविवार कारंजा, एम.जी. रोड, मेनरोड, शालीमार, मुंबईनाका, सारडा सर्कल, व्दारका अशा अत्यंत वर्दळीच्या आणि वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या भागांची जातीने पाहणी केली. केवळ गाडीतून फेरफटका न मारता, अनेक ठिकाणी स्वतः गाडीतून उतरून त्यांनी रस्त्यावरील अडथळे, पार्किंगची समस्या, फुटपाथ गिळंकृत करणारे अतिक्रमणे आणि सिग्नल व्यवस्थेतील त्रुटी बारकाईने तपासल्या.
नूतन उपायुक्तांचा ‘पंचसूत्री’ ॲक्शन प्लॅन !
शहराचा दौरा संपताच श्रीमती किरिथिका यांनी वेळ न दवडता संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना तात्काळ अंमलबजावणीसाठी ‘पंचसूत्री’ कार्यक्रम दिला. हा केवळ आदेश नसून, नाशिकच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दिलेला कडक ‘अल्टीमेटम’ मानला जात आहे.
१. तात्काळ अतिरिक्त कुमक: ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे, तिथे तात्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि वाहतूक नियंत्रक नेमा. एकही चौक मोकळा दिसता कामा नये.
२.सिग्नल यंत्रणेचे ऑडिट शहरातील सर्व महत्त्वाच्या सिग्नल यंत्रणांचे पुन्हा परीक्षण करा आणि गरजेनुसार त्यात आवश्यक ते तांत्रिक बदल घडवून आणा.
३. अतिक्रमणावर थेट कारवाई: रस्त्यावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणांवर कोणतीही हयगय न करता तातडीने कठोर कारवाईचा बडगा उगारा.
४. विद्यार्थी सुरक्षा प्राधान्य: शाळा-कॉलेजच्या बसेस आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या. या वाहनांकडून नियमांचे उल्लंघन होता कामा नये.
५. जनजागृतीची मोहीम: नाशिककरांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी एक प्रभावी जनजागृती मोहीम राबवा.
नाशिककरांना दिलासा; पोलिसांकडून सहकार्याचे आवाहन
श्रीमती किरिथिका सी.एम. यांच्या या धडाकेबाज सुरुवातीमुळे नाशिकमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. एका महिला अधिकाऱ्याने पदभार स्वीकारताच दाखवलेली ही तत्परता आणि कामाचा झपाटा कौतुकाचा विषय ठरला आहे. “शिस्तबद्ध वाहतूक, सुरक्षित नाशिककर” हेच आमचे ध्येय असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.







