सिडको परिसरात ‘हिंदू धर्म रक्षक’ म्हणून झळकले बॅनर्स; तरुणाईकडून थेट राजकारणात येण्याची जोरदार मागणी!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.२:-राज्य आणि केंद्रात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार सत्तेत असताना, नाशिक शहरात आता एका नव्या हिंदुत्ववादी नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गणेश वाघ आणि राकेश कोष्टी या जोडगोळीने ‘हिंदू धर्म रक्षक’ म्हणून आपली नवी ओळख निर्माण केली असून, त्यांच्या नावाची शहरात मोठी दहशत आणि दरारा निर्माण झाला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त सिडको परिसरात लावण्यात आलेले त्यांचे ‘हिंदू धर्म रक्षक’ असे उपाधी दिलेले बॅनर्स सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.
राज्यात आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचा झेंडा अधिक बुलंद होत असताना, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत नाशिकमध्ये वाघ आणि कोष्टी यांनी हिंदुत्ववादी संघटनांना नवसंजीवनी दिल्याचे चित्र आहे. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे किंवा हिंदू धर्माविरोधी होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात त्यांनी उघडलेली आघाडी यशस्वी ठरत असून, त्यामुळे तरुणांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे. यापूर्वी अशा घटना घडल्यास हिंदू नागरिक किंवा संघटना फारशा पुढे येत नसत, मात्र आता वाघ आणि कोष्टी यांच्या एका हाकेवर शेकडो तरुण एकत्र येत असल्याने परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.
या जोडीच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वाढत्या जनाधारामुळे हिंदू विरोधी कोणतेही कृत्य करण्यापूर्वी शंभर वेळा विचार केला जात आहे. त्यांच्या नावानेच अनेकांची धाबे दणाणत असून, त्यांचा ‘धाक’ शहरात पुरेसा ठरत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना मिळत असलेले छुपे राजकीय पाठबळ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेला पाठिंबा यामुळे त्यांचे बळ आणखी वाढले आहे.
तरुणाईचा आग्रह: “आता राजकारणात या!”
वाघ आणि कोष्टी यांच्या कार्यामुळे प्रभावित झालेल्या तरुणाईमध्ये आता एका नव्या मागणीने जोर धरला आहे. “समाजाला अशाच खऱ्या हिंदू धर्म रक्षकांची गरज आहे. त्यांनी आता केवळ सामाजिक कार्यात न राहता आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे आणि हिंदूंचे राजकीय स्तरावर रक्षण करावे,” अशी भावना तरुण व्यक्त करत आहेत. “आम्ही त्यांना भरघोस मतांनी निवडून आणू,” असा विश्वासही ही तरुणाई व्यक्त करत आहे. त्यामुळे, आगामी काळात गणेश वाघ आणि राकेश कोष्टी हे राजकारणात प्रवेश करणार का, याकडे संपूर्ण नाशिक शहराचे लक्ष लागले आहे.







