गुन्हे शाखेच्या युनिट १ ची धडाकेबाज कारवाई; ३.६ लाखांच्या ८ दुचाकी जप्त, ५ गुन्हे उघडकीस
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२ : (विशेष प्रतिनिधी) – दरोड्याच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आरोपी हा प्रत्यक्षात सराईत वाहनचोर निघाला असून, त्याच्याकडून तब्बल ८ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाला मोठे यश आले आहे. जाकीर अख्तार शेख (वय ४०, रा. खडकाळी, भद्रकाली) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. एकाच कारवाईमुळे शहरातील वाहनचोरी आणि दरोड्याच्या प्रयत्नाचे असे एकूण ५ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या.
गुन्हे शाखा युनिट १ चे पथक या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असतानाच, पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि प्रदीप म्हसदे यांना त्यांच्या एका विश्वासू गुप्त बातमीदाराकडून एक ‘पक्की खबर’ मिळाली. एक संशयित इसम चोरीच्या टीव्हीएस मॅक्स १०० मोटारसायकलवरून सीबीएसकडून कॅनडा कॉर्नरच्या दिशेने जाणार असल्याची ती खबर होती.
या माहितीची तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कल्पना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार, पथकाने क्षणाचाही विलंब न लावता शरणपूर रोडवरील पोलीस ग्राऊंडसमोरील बस स्थानकाजवळ सापळा रचला. बातमीदाराने दिलेल्या वर्णनाचा इसम येताच, पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला घेरून ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या जाकीर शेखकडे असलेली मोटारसायकल (एम. एच १५-ई.एक्स-८७७१) ही सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील (गु.र.नं. २५५/२०२५) चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पण खरी धक्कादायक माहिती तेव्हा समोर आली, जेव्हा त्याच्या रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. तो मुंबईनाका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या प्रयत्नाच्या (गु.र.नं. १९४/२०२५) गंभीर गुन्ह्यातील ‘वॉन्टेड’ आरोपी असल्याचेही उघड झाले.
पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोपटासारखे बोलायला सुरुवात केली आणि ठक्कर बाजार व मेळा बसस्थानक परिसरातून आणखी ७ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याच्या या कबुलीजबाबावरून पोलिसांनी एकूण ३,६०,००० रुपये किमतीच्या ८ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
हे गुन्हे आले उघडकी
सरकारवाडा पोलीस ठाणे: ४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे (गु.र.नं. २५५/२५, १६८/२५, २६४/२५, २६७/२५)
मुंबईनाका पोलीस ठाणे: १ दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा (गु.र.नं. १९४/२५)
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा युनिट १ च्या सुदाम सांगळे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोर टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.







