पालिकेच्या दुटप्पी भूमिकेमुळे ‘आरोग्यम्’वर कारवाई, ‘भाई’गिरीला मात्र संरक्षण; सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट
लाल 🚨 दिवा-दि१’-नाशिक, विशेष प्रतिनिधी:शहराला विद्रूप करणाऱ्या राजकीय नेते आणि तथाकथित ‘भाईं’च्या गगनचुंबी होर्डिंग्जकडे सोयीस्करपणे डोळेझाक करणाऱ्या नाशिक महानगरपालिकेने आपला ‘सिंघम’ अवतार एका सामान्य महिलेवर दाखवला आहे. स्वतःच्या पायावर उभे राहून ‘आरोग्यम योग वर्ग’ चालवणाऱ्या एका महिलेने लावलेल्या अवघ्या अडीच बाय अडीच फुटाच्या जाहिरात फलकावर थेट गुन्हा दाखल करत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या ‘मृदुमकी’चे आणि बेगडी कर्तव्यनिष्ठेचे प्रदर्शन केले आहे. या कारवाईने पालिकेचा भोंगळ कारभार आणि दुटप्पीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
नवीन नाशिकमधील अश्विन नगर येथील गणपती मंदिर उद्यानाच्या कंपाउंडवर ‘आरोग्यम योग वर्ग’ या नावाने चालवल्या जाणाऱ्या वर्गाची माहिती देणारा एक छोटा फलक लावण्यात आला होता. प्राणायाम, ध्यान आणि योगासनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करणारा हा फलक महापालिकेच्या उद्यान निरीक्षकांच्या नजरेत इतका खुपला की, त्यांनी थेट अंबड पोलीस ठाणे गाठले. राजू साहेबराव बदुर, उद्यान निरीक्षक, यांनी महाराष्ट्र मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार या फलकधारकावर कायदेशीर फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार, पालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा फलक लावण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, ज्या दिवशी ही कारवाई झाली, त्याच दिवशी नाशिक शहराच्या चौकाचौकात राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाचे, अभिनंदनाचे आणि विविध कार्यक्रमांचे भलेमोठे, बेकायदेशीर होर्डिंग्ज दिमाखात झळकत होते. अनेक ठिकाणी तर वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि शहर विद्रूप करणारे फलक वर्षानुवर्षे उभे आहेत. यावर मात्र कारवाईचा साधा विचारही पालिकेच्या मनात शिवत नाही. नियमांचे पालन फक्त सामान्य नागरिकांनीच करायचे का? आणि नेत्यांना, गुंडांना कायदा लागू होत नाही का? असा संतप्त सवाल नाशिककर विचारत आहेत.
‘आरोग्यम्’ देणाऱ्यांवर गुन्हा, ‘अराजक’ पसरवणाऱ्यांना मोकळे रान!
एकीकडे ‘स्मार्ट सिटी’चा गवगवा करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्या हिमतीवर छोटा व्यवसाय करून चार पैसे कमावणाऱ्या आणि समाजाला आरोग्यम् देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करायचा, हा पालिकेचा कुठला न्याय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. “मन आणि शरीरावरील तणावाला निरोप द्या,” असा संदेश देणाऱ्या या छोट्या फलकामुळे शहराचे विद्रुपीकरण झाले, पण गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांच्या ‘चमकोगिरी’ने शहराला जणू ‘स्वर्गा’चे स्वरूप प्राप्त झाले आहे, असा उपरोधिक टोला नागरिक समाजमाध्यमांवर लगावत आहेत.
या एका कारवाईने महापालिकेच्या कारभारातील विरोधाभास उघड केला आहे. जिथे कडक कारवाई अपेक्षित आहे, तिथे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जाते आणि जिथे सामंजस्याची भूमिका आवश्यक आहे, तिथे कायद्याचा बडगा उगारला जातो. आता महापालिका आयुक्त हीच तत्परता बलाढ्य होर्डिंगबाजांवर दाखवून आपल्या पारदर्शक कारभाराचा पुरावा देणार का, की हा कायदा फक्त सामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच एक शस्त्र बनून राहणार, याकडे संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे.







