नाशिक ! ‘स्वागत’मध्येच रचला होता नशेचा डाव, गुन्हे शाखेच्या ‘ग्रँड एन्ट्री’ने ड्रग्ज माफियांना घाम फुटला!

महिलेसह चौघांच्या टोळीला बेड्या, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करत गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ३० सप्टेंबर: शहराचे हृदय असलेल्या आणि कायम वर्दळीच्या द्वारका सर्कल परिसरातील ‘हॉटेल स्वागत’मध्येच एमडी ड्रग्जचा ‘स्वागत-सौदा’ करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट १ ने पर्दाफाश केला आहे. अत्यंत नाट्यमय घडामोडीत, पोलिसांनी सापळा रचून एका महिलेसह चौघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे ३० ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि वाहनासह एकूण १७ लाख १५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धाडसी कारवाईने नाशिकमधील ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

शहरातील तरुण पिढीला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या ड्रग्ज माफियांवर कारवाई करण्याचे सक्त आदेश पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे पथक शहरात गस्त घालत असतानाच, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना त्यांच्या विश्वासू खबऱ्याकडून एक मोठी टीप मिळाली. “मुज्जफर उर्फ मुज्जु शेख आणि त्याची टोळी हॉटेल स्वागतमध्ये एमडीची मोठी डील करण्यासाठी येणार आहे,” ही माहिती मिळताच पोलीस यंत्रणा विजेच्या वेगाने कामाला लागली.

सायंकाळची वेळ, हॉटेलमध्ये थरार!

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. श्री. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे हॉटेल स्वागत परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, सायंकाळी साडेपाचच्या सुमारास टोळीचा मुख्य सूत्रधार मुज्या उर्फ मुज्जफर शेख (वय ४३, भद्रकाली), त्याचा साथीदार शेख फरहान (वय २२, बागवानपुरा), अनिल वर्मा (वय ३२, तपोवन) आणि या रॅकेटमधील महिला हिना कापसे (वय ३५, निलगीरी बाग) हे एका चारचाकी वाहनातून हॉटेलमध्ये दाखल झाले. ते आपल्या गिऱ्हाईकाची वाट पाहत असतानाच, दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने त्यांच्यावर झडप घातली. काही कळण्याच्या आतच पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले ३० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) सापडले

पोलिसांनी ४.५ लाख रुपये किमतीच्या ड्रग्जसह त्यांच्याकडील चारचाकी वाहन, महागडे मोबाईल फोन असा एकूण १७,१५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने हे ड्रग्ज कोठून आणले आणि ते नाशिकमध्ये कोणाला विकणार होते, याचा सखोल तपास आता भद्रकाली पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपआयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ च्या धडाडीच्या टीमने पार पाडली. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडले असून, पोलिसांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!