नाशिकरोडमध्ये खाकीचा ‘सिंघम’ अवतार! भाईगिरीच्या रॅलीची पोलिसांनी काढली वरात; ‘चिमण्या’ फरार, १७ साथीदार गजाआड!
खुनाच्या गुन्ह्यातून सुटलेल्या ‘चिमण्या भाई’ची सशस्त्र मिरवणूक बेतली अंगलट; व्हायरल रील बघून पोलीस ॲक्शन मोडवर; भररस्त्यात धिंड काढून उतरवली भाईगिरीची नशा!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३०:-नाशिकरोड (विशेष प्रतिनिधी): शहरात कायद्याचेच राज्य चालते, गुंडांचे नाही! हा सणसणीत संदेश देत नाशिकरोड पोलिसांनी गुन्हेगारी विश्वाला जबरदस्त हादरा दिला आहे. खुनाच्या गुन्ह्यातून कारागृहातून सुटलेल्या कुख्यात महेश सोनवणे उर्फ ‘चिमण्या भाई’च्या स्वागतासाठी त्याच्या समर्थकांनी शहरात तलवारी नाचवत, दहशत माजवत मिरवणूक काढली. या गुंडगिरीचा ‘रील’ बनवून सोशल मीडियावर दहशत पसरवण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, हा ‘रील शो’ त्यांच्यावरच उलटला. नाशिकरोड पोलिसांनी अत्यंत गंभीर दखल घेत यातील १७ जणांच्या मुसक्या आवळल्या आणि ज्या रस्त्यांवर त्यांनी उन्माद माजवला होता, त्याच रस्त्यांवरून त्यांची ‘धिंड’ काढून भाईगिरीची सर्व नशा उतरवली आहे. या धडक कारवाईनंतर मुख्य सूत्रधार ‘चिमण्या भाई’ मात्र पसार झाला आहे.
या थरारक घटनेची सुरुवात झाली २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता. अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातून महेश सोनवणे उर्फ ‘चिमण्या’ हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. तुरुंगातून बाहेर पडताच कायद्याला आव्हान देण्याच्या अविर्भावात त्याच्या समर्थकांनी जंगी स्वागताचे आयोजन केले होते. प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश फसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगार, सुमित बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळी यांच्यासह १५ ते २० जणांच्या टोळक्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांवरून एकच धुमाकूळ घातला.
धारदार शस्त्रे आणि तलवारी हवेत फिरवत, आरडाओरड करत या टोळक्याने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि वाहतुकीला अडथळा आणत, त्यांच्या अंगावर धावून जात त्यांनी आपली दहशत प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकाराचे चित्रीकरण करून ‘भाई इज बॅक’ अशा थाटात रील व्हायरल करण्यात आले.
पोलिसांचा ॲक्शन मोड ऑन; रीलचे रूपांतर ‘रिॲलिटी’त!
ही घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नजरेतून सुटली नाही. शहरात सातत्याने होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर उठणाऱ्या प्रश्नांना त्यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिले. व्हायरल रीलची गंभीर दखल घेत, सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि या रॅलीत सहभागी असलेल्या १७ जणांना ताब्यात घेतले.
ज्या रस्त्यावर माज, त्याच रस्त्यावर धिंड!
पोलिसांनी केवळ अटक करून समाधान मानले नाही. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम आहे आणि नागरिकांमध्ये त्यांची दहशत असता कामा नये, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक अभूतपूर्व पाऊल उचलले. अटक केलेल्या सर्व आरोपींना नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून ते गजबजलेल्या बिटको पॉईंटपर्यंत पायी चालवत त्यांची धिंड काढण्यात आली. कालपर्यंत जे छाती फुगवून तलवारी नाचवत होते, तेच आज मान खाली घालून पोलिसांच्या गराड्यात चालत होते. हा देखावा पाहून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांच्या या धाडसी कारवाईने गुन्हेगारी प्रवृत्तींना एक कडक संदेश दिला आहे की, नाशिकरोडमध्ये भाईगिरी खपवून घेतली जाणार नाही.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास विजय टेमगर करीत आहेत. या प्रशंसनीय कामगिरीमुळे नागरिकांमधून नाशिकरोड पोलिसांचे कौतुक होत आहे.







