गुन्हे शाखेच्या ‘सिंघम’ चौकडीची धडाकेबाज कामगिरी; शिताफीने रचला सापळा, रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८:- (विशेष प्रतिनिधी): शहरात गेल्या काही दिवसांपासून मोबाईल आणि लॅपटॉप चोरीचे सत्र सुरू करून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आंध्र प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीच्या नाशिक शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अत्यंत शिताफीने आणि अहोरात्र परिश्रम घेत गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक १ ने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५३ महागडे मोबाईल, ०६ लॅपटॉप असा एकूण ३५ लाख १० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, शहरांतील एकूण ६ मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या थरारक कारवाईची सुरुवात झाली ती सातपूर भागातील एका चोरीच्या घटनेने. दिनांक २६ सप्टेंबर रोजी सातपूर येथील ‘सुयोग कलेक्शन’ या दुकानातून दोन लॅपटॉप चोरीला गेले होते. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, शहरात वाढत्या चोऱ्यांची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. संदिप मिटके यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर, या गुन्ह्याचा छडा लावण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या चार अत्यंत हुशार आणि धाडसी शिलेदारांवर आली. पोलीस हवालदार नाझीमखान पठाण, पोलीस हवालदार विशाल काठे, पोलीस हवालदार संदिप भांड आणि पोलीस अंमलदार अमोल कोष्टी या चौकडीने दिवस-रात्र एक करून तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास आणि गुप्त खबऱ्यांचे जाळे सक्रिय करून या पथकाने आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली. याच अथक परिश्रमाचे फळ म्हणून, हवालदार नाझीमखान पठाण आणि अंमलदार अमोल कोष्टी यांना त्यांच्या खास खबऱ्याकडून आरोपी आंध्र प्रदेशात पळून जाणार असल्याची पक्की खबर मिळाली.
थरारक पाठलाग आणि रेल्वे स्थानकावर सापळा
क्षणाचाही विलंब न लावता ही माहिती वपोनि/डॉ. अंचल मुदगल यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली आणि अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला. चोरट्यांना पोलिसांच्या कारवाईचा कोणताही सुगावा लागला नाही. रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी १) रामु बालराज (वय-४०) आणि २) सत्यवेल श्रीनिवासु (वय-३६, दोघेही रा. चित्तुर, आंध्र प्रदेश) यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून सातपूरमधील चोरीचे दोन्ही लॅपटॉप जप्त करण्यात आले.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन आपल्या खास शैलीत विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी पोपटासारखे बोलायला सुरुवात केली. त्यांनी आपला साथीदार आनंद नित्यानंद (वय-१९) आणि एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने नाशिक शहरातील सातपूर, सरकारवाडा आणि पंचवटी परिसरातून अनेक मोबाईल आणि लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या माहितीवरून पोलिसांनी विविध ठिकाणांहून एकूण ६ लॅपटॉप आणि ५३ मोबाईल फोन्स असा तब्बल ३५,१०,१०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे सातपूर, सरकारवाडा आणि पंचवटी पोलीस ठाण्यांमधील एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या कारवाईचे खरे ‘सिंघम’: ही धाडसी चौकडी!
या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यामागे गुन्हे शाखा युनिट १ च्या चार कर्मचाऱ्यांनी घेतलेले अहोरात्र परिश्रम आणि त्यांचे बुद्धीचातुर्य कारणीभूत ठरले. हेच या कारवाईचे खरे नायक आहेत:
- पोलीस हवालदार/१३१६ नाझीमखान फकिरमोहमद पठाण

- पोलीस अंमलदार/२२७३ अमोल सुरेश कोष्टी

- पोलीस हवालदार/१८८३ विशाल दिनकर काठे

- पोलीस हवालदार/९०० संदिप जयराम भांड

सदरची कौतुकास्पद कामगीरी मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, आणि मा. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक/मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक/डॉ. अंचल मुदगल, पोउनि/चेतन श्रीवंत, पोउनि/सुदाम सांगळे, पोहवा/प्रविण वाघमारे, विशाल काठे, नाझीमखान पठाण, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, विशाल देवरे, प्रशांत मरकड, मिलींदसिंग परदेशी, रोहिदास लिलके, महेश साळुंके, धनंजय शिंदे, उत्तम पवार, राजेश लोखंडे, पोअं/अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, मपोअं/अनुजा येलवे, चालक पोअं/समाधान पवार अशांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरित्या पार पाड







