विश्वासघात! नामांकित यात्रा कंपनीला गंडवणारा संगमनेरचा ट्रॅव्हल एजंट पुण्यातून अटकेत.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २५: दुबईवारीचे स्वप्न दाखवून तब्बल ५० प्रवाशांना बनावट विमान तिकीटे देत नाशिकच्या नामांकित ‘चौधरी यात्रा कंपनी’ची जवळपास २० लाखांची फसवणूक करणाऱ्या ‘माईल स्टोन हॉलीडेज’च्या संचालकाला नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने पुण्यातून शिताफीने अटक केली आहे. तेजस शशीकांत वैष्णव (वय ३१) असे या महाठगाचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे टूर ऑपरेटर वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिक येथील प्रसिद्ध चौधरी यात्रा कंपनी प्रा. लि. चे संचालक श्री. सत्यनारायण चौधरी यांनी जानेवारी महिन्यात मुंबई-दुबई-अबुधाबी यात्रेचे आयोजन केले होते. यात्रेसाठी ५० प्रवाशांनी पूर्ण रक्कम कंपनीकडे जमा केली होती. चौधरी यात्रा कंपनीने या ५० प्रवाशांच्या विमान तिकीटांसाठी संगमनेर येथील ‘माईल स्टोन हॉलीडेज प्रा. लि.’ या कंपनीला १० लाख ८२ हजार ५०० रुपये दिले होते. ठरल्याप्रमाणे, माईल स्टोन कंपनीने एअर इंडिया व इंडिगो विमानाची ५० तिकीटे चौधरी यात्रा कंपनीला पाठवली.
विमानतळावर स्वप्नांचा चक्काचूर!
प्रवासाच्या दिवशी, म्हणजेच १६ जानेवारी २०२५ रोजी, सर्व ५० प्रवासी मोठ्या उत्साहात दुबईला जाण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. मात्र, तिथे त्यांच्या स्वप्नांचा अक्षरशः चक्काचूर झाला. चेक-इन काउंटरवर तिकीटे स्कॅन केली असता, केवळ ४ तिकीटेच वैध असल्याचे सिस्टीममध्ये दिसले. उर्वरित ४६ तिकीटे बनावट असल्याचे समोर येताच प्रवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर, ऐनवेळी ही यात्रा रद्द करावी लागली, ज्यामुळे चौधरी यात्रा कंपनीची मोठी बदनामी झाली. प्रवाशांना परत करावी लागलेली रक्कम आणि इतर खर्च मिळून कंपनीचे एकूण १९ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.
पोलिसांची चक्रे फिरली आणि ठग जाळ्यात!
या भयंकर फसवणुकीनंतर चौधरी यांनी नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक यांनी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश थेट गुंडा विरोधी पथकाला दिले.
गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी तेजस वैष्णव हा पुण्यातूनच आपल्या काळ्या कारनाम्यांचे जाळे विणत आहे. या माहितीच्या आधारे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे एक विशेष पथक तात्काळ पुण्याला रवाना झाले.
पथकाने मानवी आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपीचा माग काढला. आरोपी तेजस वैष्णव हा बानेर व बावधन परिसरात फिरस्ता असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचला आणि अखेरीस २४ सप्टेंबर रोजी त्याला बानेरमधील विरभद्र नगर परिसरातून जेरबंद केले. त्याला पुढील कारवाईसाठी नाशिकला आणून सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णीक, उपआयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, सहा. आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सपोनि ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदिप ठाकरे, सुनिल आडके, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे व सुनिता कवडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.







