चोरीचा लॅपटॉप विकण्याचा प्रयत्न अंगलट; खबऱ्यांच्या अचूक माहितीवर पोलिसांनी सापळा रचून आवळल्या मुसक्या. घरफोडी, वाहनचोरी आणि मोबाईल स्नॅचिंगच्या सत्राला पूर्णविराम.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २५: म्हसरूळ आणि पंचवटी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी, मोबाईल स्नॅचिंग आणि वाहनचोरीच्या घटनांनी नागरिकांना वेठीस धरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात म्हसरूळ गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. खबऱ्यांच्या अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून या जोडीला अटक केली. त्यांच्याकडून तब्बल ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण ६ गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, म्हसरूळ पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींच्या मागावर राहण्याचे सक्त आदेश दिले होते. तपास सुरू असतानाच, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सतीश वसावे, पोलीस अंमलदार मनोज आहेर व पंकज चव्हाण यांना त्यांच्या गुप्त खबऱ्यामार्फत एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. दोन सराईत चोरटे चोरीचा लॅपटॉप विकण्यासाठी म्हसरूळ गावातील वरवंडी रोड परिसरात येणार असल्याची पक्की खबर मिळताच, पथकाने क्षणाचाही विलंब न लावता कारवाईची चक्रे फिरवली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ म्हसरूळ गाव परिसरात सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या वर्णनानुसार, दोन इसम मोटारसायकलवरून येताना दिसले. त्यांच्या संशयास्पद हालचाली आणि खांद्यावरील बॅग पाहून पोलिसांचा संशय बळावला. पथकाने अत्यंत शिताफीने या दोघांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्यांची नावे विचारली असता, त्यांनी आपली नावे रितेश भाऊसाहेब चव्हाण (वय २६, रा. पेठ रोड) आणि साहिल केशव निकम (वय २२, रा. म्हसरूळ) अशी सांगितली. हे दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याची खात्री होताच पोलिसांनी त्यांना पोलिसी खाक्या दाखवला.
एकामागून एक ६ गुन्हे उघड!
ताब्यातील मोटारसायकल आणि बॅगेतील लॅपटॉप चोरीचा असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी आपल्या तपासकौशल्याचा वापर करत दोघांचीही कसून चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या जोडीने अखेर पोलिसांपुढे गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यातील ५ आणि पंचवटी पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ६ गुन्हे केल्याचे मान्य केले. यामध्ये नुकतेच घडलेले मोबाईल स्नॅचिंगचे ३ गुन्हे, पेठ रोडवरील वाईन शॉपमधील धाडसी घरफोडी आणि महागड्या पल्सर मोटारसायकल चोरीचा गुन्हा यांचा समावेश आहे.

त्यांच्याकडून पोलिसांनी ३ लाख ५५ हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल हँडसेट, १ लॅपटॉप, ३ दुचाकी आणि घरफोडीत चोरलेले महागडे मद्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ही कौतुकास्पद कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, सपोनि उमेश बोरसे, पोउपनि दीपक पटारे आणि त्यांच्या संपूर्ण गुन्हे शोध पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या कामगिरीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.







